June 22, 2025

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे शुभारंभ

पुणे, ९ जून २०२५: महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन हडपसर येथे करण्यात आले. या ऐतिहासिक उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी हडपसर आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे, युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हनुमंत शेळके आणि सचिव डॉ. स्वाती शेळके यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

२००९ साली बीड जिल्ह्यातून डॉ. हनुमंत शेळके आणि डॉ. स्वाती जोगदंड शेळके या दांपत्याने युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली. सन २०३० पर्यंत रेबीजचा पूर्णत: नायनाट करण्याचे उद्दिष्ट ठेवत या फिरत्या दवाखान्याची संकल्पना साकारण्यात आली आहे. ग्रामीण भागात श्वानांची वाढती संख्या, श्वानदंशामुळे उद्भवणारे आरोग्यविषयक प्रश्न आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा अभाव या सगळ्या समस्यांवर तोडगा म्हणून या फिरत्या रुग्णालयाची रचना करण्यात आली आहे.

सुमारे २ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या अत्याधुनिक दवाखान्यात दरमहा ५०० शस्त्रक्रिया करण्याची क्षमता असून, एकावेळी १०० कुत्र्यांना ठेवता येण्याची सुविधा आहे. या दवाखान्यात ऑपरेशन थिएटर, ओपीडी, लसीकरण कक्ष, आपत्कालीन उपचार व्यवस्था, नसबंदी सेवा, तसेच कन्व्हर्टेबल कॉन्फरन्स रूम, किचन, अभिलेख कक्ष, चर्चासत्र कक्ष आदी सुविधा उपलब्ध आहेत. दवाखान्याच्या पहिल्या मजल्यावर १० कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली असून, वीज निर्मितीसाठी सौरऊर्जेचा वापर केला जात आहे.

या फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून राज्यभरातील विविध भागांमध्ये श्वान व इतर प्राण्यांसाठी आरोग्यसेवा पोहोचवण्याचा उद्देश असून, हे रुग्णालय पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात एक आदर्श निर्माण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.