September 12, 2025

पुणे: शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी धंगेकर

पुणे, २० मे २०२५: माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती करून राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. नाशिक, ठाण्याच्या धर्तीवर पुण्यातही महानगर प्रमुखपद निर्माण करण्यात आले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा मी सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करेन. पुण्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी पूर्ण प्रयत्न करून एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर टाकलेला विश्‍वास सार्थकी लावीन. – रवींद्र धंगेकर, माजी आमदार

कसबा विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक जिंकल्यानंतर रवींद्र धंगेकर हे विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावर लढवली. पण त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर धंगेकर यांनी काही आठवड्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महामंडळासह पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सुरु होती. आगामी काही महिन्यात पुणे महापालिकेची निवडणूक होणार असून, महायुतीतील सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पुण्यातून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच धंगेकर यांच्याकडे महानगर प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पुणे शहरात शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे काम सुरु आहे. पण आता नाशिक, ठाणे यासह अन्य मोठ्या शहरांमध्ये महानगर प्रमुखपद निर्माण केले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धंगेकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

नाना भानगिरे यांचे होणार काय?
शिवसेनेने पुणे महानगर प्रमुख हे पद निर्माण करून त्याची जबाबदारी धंगेकर यांच्याकडे दिली. त्यामुळे शहर प्रमुख म्हणून नाना भानगिरे हे यांच्या पदाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षातर्फे भानगिरे यांना कोणतीही सूचना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शहरप्रमुख पद कायम राहणार की भानगिरे यांना अन्य पद दिले जाणार याकडे लक्ष लागले आहे.