May 10, 2024

पुणे: माथाडी संघटनेच्या नावाखाली व्यावसयिकाकडे खंडणी मागणारे गजाआड

पुणे, ०२/०९/२०२३: माथाडी संघटनेच्या नावाखाली व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. हडपसर आणि येरवडा भागात या घटना घडल्या.

सागर सुभाष वायकर (वय ३६), शिवम मारुती कुंजीर (वय २२, रा. कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यावसायिकाचा टेम्पो मांजरी परिसरात एका इमारतीजवळ फर्निचर साहित्य घेऊन आला होता. त्यावेळी आरोपी वायकर, कुंजीर यांनी टेम्पो अडवला. टेम्पोतील फर्निचर साहित्य आमच्या संघटनेचे कामगार उतरविणार, अशी धमकी वायकर आणि कुंजीर यांनी व्यावसायिकाला दिली. व्यावासयिकाला धमकावून चार हजार ८०० रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे तपास करत आहेत.

दरम्यान, येरवडा भागातील कल्याणीनगर परिसरात टेम्पो अडवून माथाडी संघटनेच्या नावाखाली एक लाख २० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. विकी नारायण ओैरंगे (वय ३१, रा. गांधीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका व्यावसायिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक माल घेऊन कल्याणीनगर भागातील एका कंपनीत आला होता. त्यावेळी आरोपी ओैरंगेने टेम्पो अडवला. त्याने माथाडी संघटनेच्या नावाखाली व्यावसायिकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास माल उतरवू दिला जाणार नाही, अशी धमकी देऊन त्याने तडजोडीत ८० हजार रुपये खंडणीपोटी उकळले. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करत आहेत.