पुणे, २० मे २०२५: पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सणसवाडी, फुरसुंगी आणि धानोरी या भागांमध्ये तीन ठिकाणी होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या घटनांमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, होर्डिंग हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. होर्डिंग खाली कोणी अडकलं आहे का याची कसून तपासणी केली जात असून, काही ठिकाणी दुचाकी अडकलेल्या दिसल्या आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झाडे कोसळण्याच्या घटनांत वाढ
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या पावसामुळे झाड कोसळण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. पुण्यात येरवडा, कोरेगाव पार्क, धनोरी, एरंडवणे, देवाची उरुळी, बावधन, मुकुंदनगर यांसारख्या भागांत मंगळवारी झाडे कोसळली. अग्निशामक पथकाने घटनास्थळी दाखल होत रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू केले.
पिंपरी-चिंचवडमध्येही पिंपरी, जगताप डेअरी, चिखली आणि चिंचवडमध्ये झाड कोसळल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यामुळे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला. सोमवारीही दापोडी आणि आकुर्डीमध्ये झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या.
महापालिका प्रशासन सतर्क असून, नागरिकांना झाडांच्या खाली वाहने लावू नयेत, तसेच कोणत्याही अडथळ्याची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार