May 10, 2024

पुणे: सराईताचा पाहुणचार नडला, तीन पोलीस निलंबित

पुणे, दि. ७/०८/२०२३: मोक्कानुसार कारवाई केलेल्या गुंडाला उपहारगृहात नेणे तीन पोलीस अमलदारांच्या अंगलट आले आहे. संबंधिताला येरवडा कारागृहात नेत असताना बंदोबस्तावरील अमलदारांनी त्याला परस्पर उपहारागृहात नेले. मात्र, संधीचा फायदा घेउन सराईताने पलायन केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी संबंधित तीन पोलिसांना निलंबित करण्याचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिले.

पोलीस हवालदार मुरलीधर महादु कोकणे, राजूदास रामजी चव्हाण यांच्यासह तिघांना निलंबित करण्याचे आदेश दिले. हडपसर परिसरामध्ये दहशत माजवणारा गुंड राजेश रावसाहेब कांबळे (वय ३६, रा. काळेपडळ , हडपसर) २ ऑगस्टला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.

न्यायालयातून कारागृहात नेताना तिघा पोलिसांनी कांबळे याला परस्पर उपाहारगृहात नेले होते. सराईत कांबळे याच्याविरुद्ध खून, खुनी हल्ले आणि लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे दोन वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली. खटल्याच्या सुनावणीसाठी २ ऑगस्टला पोलिसांनी त्याला येरवडा कारागृहातून शिवाजीनगर न्यायालयात आणले होते. कामकाज संपल्यावर त्याला पुन्हा कारागृहात नेण्यापूर्वी बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला उपाहारगृहात नेले होते. तेथे त्यांना बोलण्यात गुंतवून कांबळे पसार झाला.