July 8, 2025

पुणे गृहनिर्माण मंडळाकडून सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, १६ जून २०२५: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील विविध योजनांतर्गत ५२ अनिवासी व २८ कार्यालयीन गाळे ई-लिलाव पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास विनियम, १९८१ आणि म्हाडा अधिनियम १९८१ अंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात आहे.

या लिलावासाठी पात्रता निकष, गाळ्यांचे तपशील, सामाजिक आरक्षण, अटी व शर्ती, अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती www.eauction.mhada.gov.in तसेच www.mhada.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी नागरिकांना यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच, १५% सामाजिक गृहनिर्माण योजना व २०% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत सोडतीनंतर रिक्त राहिलेल्या सदनिकांचे वितरण ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर होणार आहे. १० एप्रिल २०२५ पासून https://bookmyhome.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरु असून पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विकासकांकडून पुढे शिल्लक राहणाऱ्या सदनिकांचे वाटप देखील याच तत्वावर सातत्याने सुरु राहणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ची घोषणा केली असून, त्यानुसार महाराष्ट्र शासनाने ‘सर्वांसाठी घरे’ संकल्पनेवर आधारित या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. पुणे गृहनिर्माण मंडळामार्फत या योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी https://pmaymis.gov.in या यूनिफाईड पोर्टलवर नोंदणी करावी.

संपूर्ण वितरण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक असून, मंजुरी पत्रे उपमुख्य अधिकारी यांच्या डिजीटल स्वाक्षरीसह लाभार्थ्यांच्या लॉगिनमध्ये थेट उपलब्ध करून दिली जातील. कोणतेही दस्तऐवज प्रत्यक्ष मानवी स्वाक्षरी किंवा शिक्क्यासह दिले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.