May 6, 2024

पुणे: शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला व कार्यात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात तरुणाला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे, १५/०९/२०२३: के के मार्केट सातारा रोड येथे अज्ञात चार इसमांनी बस चालकास मारहाण शिवीगाळ तसेच धमकावल्याच्या आरोपांवरून खडक पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणात वाहने सिग्नल वर उभे असताना हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर कथित घटनेत झाले.

घटनेत भारतीय दंड संहिता कलम ३५३, ५०६, ५०७ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील वापरलेल्या गेलेल्या वाहनाच्या आधारे पोलीस वाहनाच्या मालकास चौकशी करिता पोलीस ठाण्यात बोलवत होते. सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाच्या कलमां‌अंतर्गत नोंदवले गेले असल्यामुळे अटक होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सदर व्यक्तीने माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाकडे‌ अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला.

त्यासोबतच अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर सुनावणी होण्यापूर्वी अटकेपासून संरक्षणाची तातडीची गरज असल्यामुळे अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज देखील माननीय न्यायालयात करण्यात आला. यामध्ये अर्जदाराचा सहभाग, घटनेचे वर्णन, घटनेचे कारण, त्याचे स्वरूप तसेच अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे आणि कोणतीही जप्तीची कारवाई करणे आवश्यक नसल्याचे नमूद करत अ‍ॅड. पुष्कर पाटील, अ‍ॅड. मयूर धाटावकर आणि अ‍ॅड. ऋतुराज पासलकर यांनी युक्तिवाद केला.

यासोबतच या गुन्ह्यातील तपास पूर्ण होण्याकरिता आरोपीची कोठडीत असण्याची आवश्यकता नाही आणि आरोपी आरोपी तपासात सहकार्य करेल तसेच तो माननीय न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करेल व माननीय न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे आणि आवश्यक असेल तसे पोलीस स्टेशन येथे स्वतः हजर राहील. माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्याय निवाड्यांचा दाखला देऊन तर गुन्हा हा पाच वर्षापेक्षा अधिकची शिक्षा असलेला नसल्या कारणामुळे माननीय सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या विविध न्याय निवाड्यांच्या आधारे माननीय सत्र न्यायालय जामीन अर्जदारास अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीपूर्वी तातडीची गरज असल्यामुळे अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जाद्वारे माननीय न्यायालयाने संरक्षण द्यावे अशी मागणी जामीन अर्जदाराच्यावतीने अ‍ॅड. पुष्कर पाटील, अ‍ॅड. मयूर धाटावकर आणि अ‍ॅड. ऋतुराज पासलकर यांनी केली.

युक्तीवादावर माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी जर जामीन अर्जदारास अटक झाली तर त्यास १५,०००/- च्या जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेचा जामीनदार तपासी अधिकाऱ्यांसमोर सादर करून, तसेच तक्रारदारास कोणत्याही प्रकारे आमिष प्रलोभन किंवा भीती वाटेल असे कोणतेही कृत्य करणार नाही, दर रविवारी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावेल आणि माननीय तपासी अधिकाऱ्यांना गुन्हेच्या तपासादरम्यान पूर्ण सहकार्य करेल या अटींवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. पुष्कर पाटील, अ‍ॅड. मयूर धाटावकर आणि अ‍ॅड. ऋतुराज पासलकर यांनी बाजू मांडली व काम पाहिले.