May 4, 2024

पुणे: कोपर्डी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीची आत्महत्या, कैदी जितेंद्र शिंदे याने येरवडा कारागृहात घेतला गळफास

पुणे, दि. १०/०९/२०२३: अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याने रविवारी (दि. १०) सकाळी सहाच्या सुमारास येरवडा कारागृहात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राज्यभरात गाजलेल्या नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावातील शाळकरी मुलीवर तिघांजणांनी सामुहिक अत्याचार करून निर्घृण खून केला होता. याप्रकरणी तिन्हीही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

कोपर्डी गावातील शाळकरी मुलीवर सामुहिक बलात्कार व हत्या केल्याची घटना २०१६ मध्ये घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ आणि नितीन गोपीनाथ भैलूमे यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. काही महिन्यांपासून त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी सहाच्या सुमारास येरवडा कारागृहातील बराकीमध्ये जितेंद्र उर्फ पप्पूने टॉवेलच्या साहयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच कारागृहातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेउन चौकशी सुरु केली आहे.

आत्महत्येसाठी टॉवेल फाडून बनवली दोरी

कोपर्डीतील सामुहिक अत्याचारातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (वय ३२, शिक्षा बंदी क्रमांक सी-१७७४४) ) येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. कारागृहातील रक्षक नीलेश कांबळे परिसरात देखभालीसाठी तैनात होते. रविवारी सकाळी ५ वाजून ५८ मिनीटांनी जितेंद्र उर्फ पप्पू याने टॉवेलच्या साहयाने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. त्यासाठी त्याने टॉवेल फाडून दोरी बनवून गळफास घेतल्याचे दिसून आले. रक्षक नीलेशने तातडीने इतर सहकार्‍यांना बोलावून घेत जितेंद्रला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. घटनेची माहिती वरिष्ठांना देउन डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. मरसाळे यांनी वैâदी जितेंद्रला सकाळी ६ वाजून १३ मिनीटांनी मृत घोषित केले.