May 14, 2025

पुणे: राष्ट्रीय लोकअदालतीचे १० मे रोजी आयोजन; वाद तडजोडीतून निकाली काढण्याची संधी

पुणे, ८ मे २०२५: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना परस्पर समजुतीतून न्याय मिळावा आणि प्रलंबित प्रकरणांचा झटपट निपटारा व्हावा यासाठी १० मे २०२५ रोजी, शनिवार, राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये करण्यात आले आहे. यावेळी अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन आणि सचिव सोनल पाटील यांनी केले आहे.

या लोकअदालतीमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३२० अंतर्गत तडजोडीयोग्य गुन्हे, चेक बाउन्स प्रकरणे, तसेच बँका आणि वीज कंपन्यांशी संबंधित दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा समावेश असणार आहे.

नागरिकांनी त्यांच्या प्रकरणांचा निपटारा लोकअदालतीद्वारे करून घ्यावा यासाठी संबंधित न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा. पक्षकारांना त्यांच्या वकिलांची मदत घेण्याची मुभा देखील आहे.

लोकअदालतीत प्रकरण निकाली निघाल्यास, नियमानुसार न्यायालयीन शुल्क परत मिळते. या प्रक्रियेमुळे वेळेची व पैशाची बचत होते. निकाल परस्पर संमतीने दिला जात असल्याने वाद मिटतो आणि दोन्ही पक्षांमधील कटुता दूर होते. लोकअदालतीचा निर्णय अंतिम असतो आणि त्यावर अपील करता येत नाही, असे सचिव सोनल पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी ०२०-२५५३४८८१ किंवा ८५९१९०३६१२ या क्रमांकांवर तसेच इंदापूरसाठी ०२१११-२२३१४९, भोरसाठी ०२११३-२२२६४७, दौंडसाठी ०२११७-२६२४२९, सासवडसाठी ०२११५-२२२३१९, जुन्नरसाठी ०२१३२-२२२१४१, बारामतीसाठी ०२११२-२२२०१७, खेड-राजगुरुनगरसाठी ०२१३५-२२२१७०, घोडेगावसाठी ०२१३३-२४४३५९, शिरूर-घोडनदीसाठी ०२१३८-२२३२६५ आणि वडगाव मावळसाठी ०२११४-२३५२१० या क्रमांकांवर संपर्क साधावा.