पुणे, ११ जानेवारी २०२५: वैकुंठ स्मशानभुमीत श्वानांनी मानवी मृतदेहाचा काही भाग पळविल्याचा प्रकार घडला नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र स्मशानभुमीतील कामाची जबाबदारी असणाऱ्या ठेकेदाराला प्रशासनाने शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबरोबरच स्मशानभुमीत नियमीत स्वच्छता, झाडांच्या धोकादायक फांद्याची छाटणी यांसारखी कामे तातडीने करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभुमी येथे मानवी मृतदेहाचा काही भाग श्वानांनी पळविल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत झाला होता. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. महापालिकेच्या विद्युत विभागासह विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथे पाहणी केली. तसेच अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी.यांनी देखील स्मशानभुमीची पाहणी केली. या पाहणीमध्ये संबंधित घटनेमध्ये मानवी मृतदेहाचा भाग श्वानांनी पळवुन नेला नसल्याचा दावा पृथ्वीराज बी.पी. यांनी केला.
दरम्यान, स्मशानभुमीतील स्वच्छता, अंत्यविधी, देखभाल दुरुस्ती अशा कामासाठी नेमलेल्या ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश पृथ्वीराज बी.पी.यांनी दिले. याबरोबरच स्मशानभुमी व परिसरात तातडीने स्वच्छता करावी, तेथील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याच्या सुचना दिल्या आहेत. स्मशानभुमीत श्वानप्रेमी नागरीक श्वानांना खाद्यपदार्थ देतात. त्यामुळे मोकाट श्वानांची संख्या वाढली आहे. स्मशानभुमीत श्वानांना खाद्यपदार्थ देण्यात येऊ नये, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, आरोग्य विभागाकडुन श्वानांना पकडण्याची कारवाई करण्यात आली आहे, यापुढेही ही कारवाई सुरु राहणार असल्याचेही त्यांनी नमुद केले.
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन