May 4, 2024

पुणे: दहशत माजविणार्‍याअट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई, आतापर्यंत ४४ सराईत जेरबंद

पुणे, दि. २१/०९/२०२३: सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणार्‍या सराईताविरूद्ध एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तर रितेश कुमार यांनी एमपीडीएनुसार त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. हर्षद राजेंद्र देशमुख (वय २७ रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे कारवाई केलेल्याचे नाव आहे.

सराईत हर्षदने साथीदारांसह सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, वाकु, लोखंडी रॉड सारख्या हत्यारांसह खंडणी, जबरी चोरी, दुखापत, अपहरण, दिवसा व रात्री घरफोडी, चोरी, जाळपोळ, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र गाळाळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पाठविला. त्यानुसार सराईत हर्षदविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

चौकट-आतापर्यत ४४ सराईत स्थानबद्ध

शहरातील विविध भागात दहशत निर्माण करणार्‍या सराईताविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ४४ सराईतांना राज्यातील विविध कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईतांची दहशत कमी होण्यास मदत झाली आहे.