October 3, 2024

पुणे : बाणेरमधील खड्ड्यंविरोधात भर पवासात महापालिकेविरोधात आंदोलन-

पुणे, ४ ऑगस्ट २०२४: बाणेर येथील राधा चौकात बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे आणि पाषाण येथील वाहतूक कोंडीची समस्या, रस्ते खड्डे मुक्त करा, चौकाचौकातून वॉर्डनची नेमणूक करा अशा असंख्य मागण्यांसाठी भर पावसात या भागातील नागरिकांसमवेत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका प्रशासना विरोधात आंदोलन केले. यावेळी मुसळदार पाऊस असूनही शंभर पेक्षा अधिक नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून बाणेर बालेवाडी सुस् , महाळुंगे, पाषाण या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडी ,रस्त्यांवरील खड्डे, पर्यायी रस्त्यांच्या रखडलेली कामे यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत, तासन् तास नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. यामुळे नागरिकांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य बिघडत आहे . यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही प्रशासन नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने बाणेर येथील राधा चौकात बैलगाडी आणून ,हलगी वाजवून प्रशासनाच्या विरोधात भर पावसात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. येथे परिसरातील अनेक सोसायट्यांचे प्रतिनिधी, महिला, नागरिक उपस्थित होते . त्यांनी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच येथे वाचून दाखविला.

आंदोलनादरम्यान प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष करत निवेदन स्वीकारण्यास सक्षम अधिकारी न पाठविल्याने या ठिकाणी निवेदन जाळून महापालिकेचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांच्या माध्यमातून मध्यस्थी केल्यानंतर
आंदोलन स्थगित करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या –
– परिसरामध्ये रस्ते खड्डेमुक्त करा.
– ट्रॅफिक वॉर्डन ची नेमणूक करा.
– सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करा. बॅरिकेड्स बसवा.
– या भागांत मुंबई बंगलूर महामार्गाजवळ नवीन अंडर पास तयार करा सेवा रस्ता सुधारणा करा.
– बालेवाडी वाकड रस्ता लवकरात लवकर सुरू करा
– महाळुंगे नांदे रस्त्याची सुधारणा करा.