May 5, 2024

पुणे: मुसळधार पावसाच्या शक्यतेने दोन दिवस शाळा बंद

पुणे, २० जुलै २०२३ : पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये मुळशी, मावळ तालुक्यात घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे. नदी नाल्यांना येणारा पूर, दरडी कोसळण्याची शक्यता यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आज आणि उद्या दुर्गम भागातील शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषता: याचा फटका रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे या भागात बसला आहे.
रात्री साडेअकराच्या सुमारास खोपोली जवळ इर्शालवाडी या गावात दरड कोसळून आख्खेगाव डोंगराखाली काढले गेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माळी गावाच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झालेली आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नवे आदेश जारी केले आहेत.

असा आहे आदेश
जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी काल रात्री घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भागातील अंगणवाड्याही आज आणि उद्या बंद ठेवल्या जाणार आहेत.

ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सीडीपीओ यांनी परिसरात असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील.
हा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित व खाजगी शाळांना लागू आहे.
इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या सामान्यपणे चालू राहतील, असेही आदेशीत करण्यात आले आहे.