September 13, 2024

पुणे: पूरस्थिती वरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

पुणे, ५ जुलै २०२४ः पुणे शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात पूरस्थितीचा पाहणी दौरा केला. जुनी सांगवी, पाटील इस्टेट, एकता नगरी येथे भेटी देऊन शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच त्यांनी खडकवासला धरणाला ही भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. खडकवासला धरणातून पूर्वी ९० हजार क्यूसेस पाणी सोडले होते, पण अशी भयानक पूरस्थिती पुण्यात निर्माण झालेली नव्हती. मग आता ३५ हजार क्यूसेस पाणी सोडल्यानंतर नागरिकांच्या घरात पाणी कसे घुसले?. नदीपात्रात राडारोडा टाकून पात्र कमी केले जात असताना, अतिक्रमणे करू दोन तीन मजल्याचे घर बांधले जात असताना अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष का केले असा प्रश्‍न उपस्थित करत अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करा, यापुढे असा ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिली.

तसेच लवासा येथेही पावसामुळे बंगल्यावर दरड कोसळली त्याबाबत लवासाचे नेमके काय झाले, असा सवाल अधिकाऱ्यांना केला. पण ठोस उत्तर न देता राज्य सरकारकडे माहिती पाठवली जाईल असे सांगण्यात आले. पण शिंदे यांचे त्यावर समाधान न झाल्याने कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अहवाल लवकर पाठवा असे आदेश दिले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “एकतानगरी येथे झालेली बांधकामे ग्रामपंचायत असताना झाली असून त्यानंतर नदीची निळी पूररेषा निश्‍चित झालेली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची यामध्ये काहीही चूक नाही. या भागातली नागरिकांच्या पुनर्वसनाचा योग्य पद्धतीने विचार झालेला आहे. अनेक झोपड्या, मध्ये सोसायटीमध्ये पाणी घुसते. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठी सुधारित बांधकाम नियमावली तयार केली जाईल. झोपडीधारकांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पुनर्वसन करू. तर सोसायट्यांसाठी क्लस्टर तयार करण्यासाठी विशेष दर्जा देऊन ‘युडीपीसीआर’मध्ये बदल करावे लागतील. या नागरिकांवर पुराची कायम टांगती तलवार राहणार नाही.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘मुळामुठा नदीला आलेल्या पुरामुळे जेथे पाणी शिरले, नुकसान झाले त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यामुळे अनेक गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी राडारोडा, भरावा टाकून नदीपात्राची रुंदी कमी केली आहे. त्यामुळे नदीची वहनक्षमता कमी होऊन पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्याने पूरस्थिती निर्माण झालेली आहे. खडकवासला धरणासह अन्य तीन धरणातून मुठा नदीत पाणी सोडले जाते. त्यामुळे पाण्याला अडथळा होणार नाही, नदीची वहन क्षमता कमी करून जमणार नाही. नदीपात्रातील अतिक्रमण, राडारोडा काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे राडारोडा टाकतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करा, कोणालाही सोडू नका असे आदेश दिले आहेत. नदीची वहन क्षमता वाढविण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी महापालिका, पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे पथक तयार करण्यास सांगितले आहे. पुरामुळे ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांचे कोणतेही नुकसान आमचे सरकार होऊ देणार नाही.

सावत्र भावाकडून खोडा घालण्याचा प्रयत्न
लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करून या योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न काही सावत्र भावांनी केला होता. पण ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. राज्यभरात एक कोटी पाच लाख पेक्षा जास्त महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. आणखीन काही अर्ज दाखल होतील. हे सरकार जनतेचे काम करणारे आहे, त्यामुळे जनतेचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे.

पायाखालची वाळू सरकल्याने फडणवीसांवर टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिबीरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली गेली. त्यावर शिंदे म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली ही महाराष्ट्राची संस्कृती, नाही परंपरा नाही. स्वतःच्या पायाखालची वाळू सरकत असल्यामुळे उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडत आहे. लाडकी बहीणसह लाडका भाऊ योजनाही आम्ही आणली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता विकासाला, कल्याणकारी योजनांना साथ देईल. या विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत आरक्षण काढणार, संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून जनतेची फसवणूक केली. पण जनता एकदा फसेल, परत फसणार नाही, असेही शिंदे म्हणाले.