June 22, 2025

पुणे: हा फक्त ट्रेलर, पाकिस्तानला पूर्ण पिक्चर दाखवू — मंत्री नितेश राणे

पुणे, ५ मे २०२५: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांकडून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. हल्ल्याला दहा ते बारा दिवस उलटून गेले असतानाही केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस कृती करण्यात आलेली नसल्याचे विरोधक म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केंद्र सरकारवर टीका केली.

यावर विचारले असता, राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, “देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. काँग्रेस सरकारने एवढ्या वर्षांत दिलं नव्हतं असं उत्तर आता दिलं जाईल. पाकिस्तानची नाक सगळ्या मार्गांनी दाबण्यात आली आहे. हे तर फक्त ट्रेलर होतं, पूर्ण पिक्चर दाखवल्यावर पाकिस्तानवाले जागेवरून कसे हलतात ते पाहा.”

आज पुणे दौऱ्यावर असलेल्या राणेंनी पुणे महसूल विभागातील मत्स्य विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती लावली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

पौड येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मुळशी बंदची हाक देण्यात आली होती. याबाबत विचारले असता राणे म्हणाले, “एक जबाबदार मंत्री म्हणून, अशा जिहादी मानसिकतेच्या लोकांना धडा शिकवणे हे माझं कर्तव्य आहे. एवढी हिंमत करणाऱ्यांना पुन्हा शौचालयात उभं राहता येणार नाही, याची काळजी आमचं सरकार नक्की घेईल. हेच जर एखाद्या मशिदीबाबत घडलं असतं, तर महाराष्ट्र शांत बसला असता का? हे सरकार हिंदुत्ववादी आहे आणि अशा लोकांना योग्य तो धडा शिकवेल.”

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, “कोरोनाच्या काळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले, तेव्हा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला का? राजीनाम्याची मागणी करण्याचा नैतिक अधिकार यांच्याकडे नाही. देशाच्या जनतेचा पंतप्रधान मोदींवर पूर्ण विश्वास आहे. यासाठी कोणाचं प्रमाणपत्र लागत नाही. पाकिस्तानचं नाक दाबण्याचे विविध मार्ग आहेत, हे त्याच्या समजून घेण्याच्या क्षमतेबाहेरचं आहे.”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, “जो माणूस स्वतःच्या निवडणुकीत निवडून येत नाही, अशांनी आम्हाला सल्ला देऊ नये. काँग्रेसला दुसरं कोणी मिळालं नाही म्हणून त्यांनी अशा व्यक्तीला पुढे केलं आहे. अशा लोकांबद्दल दया वाटते.”