March 5, 2026

Pune: शहरातील बहुतांश भागात गुरुवारी पाणीपुरवठ बंद

पुणे, २७ जानेवारी २०२६: पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवार,२९ फेब्रुवारी रोजी शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे, टाक्या व पंपिंग केंद्रांमध्ये तातडीची विद्युत व पंपिंग विषयक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी रात्री १२ वाजेपासून ते गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत. असा शहरातील मोठ्या भागात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पर्वती नवीन व जुने जलशुद्धीकरण केंद्र, त्याअंतर्गत येणाऱ्या पर्वती एमएलआर, एचएलआर व एलएलआर टाक्या, पर्वती टँक पॉइंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर, चिंचवली, वारजे जलकेंद्र तसेच वडगाव जलकेंद्राशी संबंधित विविध टाक्या व पंपिंग व्यवस्थेची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी विद्युत पुरवठा आणि पंपिंग यंत्रणा तात्पुरती बंद ठेवावी लागणार असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार पर्वती एमएलआर टाकी परिसरातील गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, कात्रज गेट, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवारी पेठ, अर्जुन बेडे स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुंढवा रोडचा काही भाग आदी भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती एचएलआर टाकी परिसरात सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, चिंचवडनगरचे काही भाग, लोअर व अपर इंदिरानगर, शिवदर्शन, बिबवेवाडी गावठाण, औंधकरनगर, गंगाधाम, शेलार मळा, टिळक वसाहत, पर्वती गावठाण, मितानगर, कुमार पृथ्वी, कोंढवा खुर्दचे काही भाग अशा विस्तृत परिसराचा समावेश आहे.

पर्वती एलएलआर टाकी अंतर्गत शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर व स्वारगेट परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. वडगाव जलकेंद्राशी संबंधित हिंगणे, आनंदनगर, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव खुर्द-बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगरचा काही भाग, टिळकनगर, दाते वसाहत आदी भाग प्रभावित होणार आहेत.

राजीव गांधी पंपिंग स्टेशनअंतर्गत संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक-खुर्द, बाणेर सिटी, मोझा, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर, राजस सोसायटी, उन्नत सोसायटी, सुंदरवन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, धनकवडी, जुना प्रभात ३५ व ४५ विभाग तसेच येवलेवाडी परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

लष्कर ते खराडी पंपिंग क्लोजरमुळे खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, इऑन परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, धनेकर नगर, यशवंतनगर, चंदननगर, सुनीतानगर, धर्मनगर, गाडीनिया, धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, मतनगर, महादेवनगर, माळवाडी, मनोहर सोसायटी यांसह अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही.

तसेच लष्कर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, गांधी भवन, पंचकाई क्लब, जीएसआर टाकी, शिवणे इंडस्ट्रीज, एसएनडीटी, एएलआर, चतु:शृंगी टाकी, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल व खडकवासला-नांदेड बुस्टर पंपिंग अंतर्गत येणाऱ्या भागांवरही या बंदचा परिणाम होणार आहे.

महापालिकेने नागरिकांना पाणी साठवण करून ठेवण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा बंद व कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यादरम्यान प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी हळूहळू पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.