पुणे, दि. ३० ऑक्टोबर, २०२५ : जयपूर घराण्याचे आश्वासक तबलावादक व पं. फतेह सिंग गंगाणी यांचे शिष्य असलेल्या निशित गंगाणी यांचे बहारदार तबलावादन, अमन वरखेडकर व सिद्धांत गरूड यांचे व्हायोलिन- सतार सहवादन आणि त्यानंतर पं जितेंद्र अभिषेकी यांचे नातू व पं. शौनक अभिषेकी यांचे पुत्र व शिष्य असलेल्या अभेद अभिषेकी यांचा ‘स्वर अभिषेक’ यांच्या सादरीकरणाने तालचक्र युवा महोत्सवाला आजपासून दमदार सुरुवात झाली.
तालवाद्यांचा देशातील एक महत्त्वाचा संगीत महोत्सव म्हणून सर्वपरिचित असलेला तालचक्र महोत्सव आजपासून विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर मधील अॅम्फी थिएटर येथे सुरु झाला. यावेळी निशित गंगाणी यांनी आपल्या एकल तबला वादनाने महोत्सवाला सुरुवात केली. तालचक्र महोत्सवाचे हे १३ वर्षे असून संगीत क्षेत्रातील आश्वासक युवा कलाकारांना या महोत्सवामध्ये हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने गेल्या काही वर्षापासून तालचक्र युवा महोत्सव ही संकल्पनाही तालचक्र महोत्सवामध्ये यशस्वीपणे राबविली जात आहे. याच दोन दिवसीय तालचक्र युवा महोत्सवाची आज सुरुवात झाली.
महोत्सवास यावर्षी पुनीत बालन समूहाचे सहकार्य लाभले आहे. आज महोत्सवाचे आयोजक व सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे, लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे सुशील जाधव, प्रसिद्ध व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये, कामाक्षी बर्वे, जयदेव बर्वे आदी मान्यवर महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. यावर्षीचा तालचक्र महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी सर्वांना प्रवेश देण्यात येईल.
सुरुवातीला निशित गंगाणी यांनी एकल तबलावादन प्रस्तुत करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. निशित यांनी तीन तालचे बहारदार सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी १६ मात्रा, लय, कायदे, जयपूर घराण्याच्या पारंपारिक बंदिशी सादर केल्या. याबरोबरच आपल्या वडिलांनी शिकविलेल्या घराण्याच्या बंदिशींची प्रस्तुतीही त्यांनी केली. घोडा पळताना येणारा आवाज, भगवान शिवाच्या डंबरूचा आवाज तबल्याच्या माध्यमातून काढत निशित यांनी सर्वांचीच वाह वाह मिळविली. त्यांनी यश खडके यांनी पूरक अशी संवादिनी साथ केली.
यानंतर अमन वरखेडकर आणि सिद्धांत गरूड यांचे व्हायोलिन- सतार सहवादन रंगले. राग बागेश्रीच्या प्रस्तुतीने त्यांनी सुरुवात केली. यामध्ये त्यांनी आलाप प्रस्तुती केली. यानंतर ताल झपताल आणि द्रुत तीन तालातील रचना त्यांनी प्रस्तुत केल्या. तिहाई सादर करीत त्यांनी समारोप केला. पांडुरंग पवार यांनी या दोघांना समर्पक तबलासाथ केली.
पहिल्या दिवसाचा समारोप अभेद अभिषेकी यांच्या ‘स्वर अभिषेक’ या कार्यक्रमाने झाला. यावेळी त्यांनी राग यमन सादर केला. विलंबित झपतालात त्यांनी ‘नादब्रह्म गुणसागर…’ ही ख्याल बंदिश गायली. ‘किनारे किनारे दरिया…’ ही त्रितालातील बंदिश त्यांनी सादर केली. द्रुत झपताल मधील तराणा देखील त्यांनी गायला. अभेद अभिषेकी यांना पांडुरंग पवार (तबला), लीलाधार चक्रदेव (संवादिनी), प्रथमेश तराळकर (पखवाज) यांनी साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
उद्या (शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर) रोजी युवा तालचक्रची सुरुवात सायं ६ वाजता कृष्णा साळुंखे यांच्या ‘शिवतांडव’ या कार्यक्रमाने होईल. यानंतरच्या दुसऱ्या सत्रात ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या विजेत्या असलेल्या अंजली व नंदिनी गायकवाड या गायक भगिनी शास्त्रीय गायन सादर करतील. तर शनिवार दि. १ नोव्हेंबर रोजी सायं ५ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे अजराडा घराण्याच्या सातव्या पिढीचे प्रतिनिधी, प्रसिद्ध तबलावादक उस्ताद अक्रम खान आणि पं. किशन महाराज यांचे शिष्य व बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांची तबला जुगलबंदी रसिकांना मोहवून टाकेल. यानंतर विवेक राजगोपालन यांच्या ‘ता धोम…’ प्रोजेक्ट या कार्यक्रम सादर होईल. यामध्ये हिप हॉप संगीत व भारतीय संगीताचा एक अनोखा मेळ रसिकांना अनुभवता येईल. पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ यांच्या सतारवादनाने १३ व्या तालचक्र महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी पद्मश्री पं. विजय घाटे हे तबला साथसंगत करतील. यावर्षीच्या तालचक्र महोत्सवासाठी पुनीत बालन समूहासोबतच बढेकर समूह, वेनकॉब, एनईसीसी, लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी, बरवा स्कीन थेरपी, फिब्रो इंडिया, वेंकीज, मस्कॉट आणि गिरिकंद हॉलिडेज यांचे सहकार्य लाभले आहे.

More Stories
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन
‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’च्या बोधचिन्हाचे आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी