पुणे, ता. ३/८/२०२४: “आधुनिक साधनांच्या उपलब्धतेमुळे मुलांमधील लेखन व वाचनाची आवड कमी होत आहे. भावी पिढीचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर मुलांमध्ये लेखन-वाचन संस्कृतीची जोपासना करायला हवी. यासाठी ‘निर्मळ रानवारा’सारखे व्यासपीठ उपयुक्त आहे,” असे मत पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यवाह सुधीर इनामदार यांनी व्यक्त केले. सुश्री फाउंडेशन आणि वंचित विकास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात इनामदार अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
भावे हायस्कुलमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी वि. ल. शिंत्रे कथा स्पर्धेचे पारितोषिक, इंदिरा गोविंद पुरस्कारांचे वितरण व ‘निर्मळ रानवारा’च्या कथा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून अभिजात माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्वाताई म्हाळगी, वंचित विकासच्या संचालिका सुनीता जोगळेकर, सहकार्यवाह देवयानी गोंगले, माजी नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, ‘निर्मळ रानवारा’च्या मुख्य संपादक ज्योती जोशी, श्रीराम ओक आदी उपस्थित होते.
पुणे मराठी ग्रंथालयाच्या सहकार्याने झालेल्या या कथा स्पर्धेत मोठ्या गटात किशोरी उपाध्ये, माधवी सोमण, स्वाती देशपांडे, तर छोट्या गटात रावी कडू, श्रुती गोखले व मैथिली दामले यांचा गौरव करण्यात आला. ‘निर्मळ रानवारा’मध्ये लेखन, चित्राच्या माध्यमातून सहभागी झालेल्या १४ मुलांना ‘इंदिरा गोविंद पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. माधुरी सहस्रबुद्धे यांना अमरेंद्र जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल वंचित विकासतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
पूर्वाताई म्हाळगी म्हणाल्या, “लेखन स्पर्धेत मोठ्यांबरोबर चिमुकल्यांनीही नोंदवलेला सहभाग आनंददायी आहे. या वयात मुलांना लिहिण्याची सवय लागणे उत्तम गोष्ट आहे. मुलांसह पालकांनीही लेखन-वाचनाची सवय लावून घेतली, तर मुलांवर त्याचा चांगला परिणाम होतो.”
स्वागत प्रास्ताविक श्रीराम ओक यांनी केले. सूत्रसंचालन तृप्ती फाटक यांनी केले.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन