July 8, 2025

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण

पुणे, २० जून २०२५ : “अवघाची संसार सुखाचा करीन…” या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओळींप्रमाणे संपूर्ण विश्वात आनंदाचे व भक्तीचे वातावरण निर्माण करणारा पालखी सोहळा आज सकाळी आळंदीतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. विठूनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर आणि दिंड्या-पताकांच्या मधोमध संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पुण्याकडे पहिलं पाऊल टाकलं.

माऊलींच्या आजोळघरातून पुण्यभूमीकडे प्रस्थान
सकाळी ७ वाजता आळंदीतील माऊलींच्या आजोळघरातून पालखीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले. शहरभर “ज्ञानोबा माऊली – तुकाराम” चा जयघोष आणि भक्तांचा ओघ पहायला मिळाला. संतांच्या चरणस्पर्शासाठी हजारो वारकरी उत्साहाने सहभागी झाले होते. तर वारकरींच्या दिंड्यांनी आणि भगव्या पताका-ध्वजांनी मार्ग भक्तिमय केला असून, पुणे शहर आज भक्तिरसात चिंब भिजलेले आहे.

आजचा मार्ग आणि मुक्काम ः
पहिला विसावा: संत ज्ञानेश्वर महाराज थोरले पाऊडक
रात्रीचा मुक्काम: विठोबा मंदिर, पुणे

भक्तिभावाने ओतप्रोत वारी ः
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी “विठ्ठल! विठ्ठल!” असा गजर करत वारकरी परंपरेचे दर्शन घडवले. तुळशी वृंदावन, डोक्यावर माठ, हातात टाळ आणि मुखी अभंग अशा भक्तिभावात सहभागी भाविकांनी या वारीचा उत्सव अधिकच तेजाळून टाकला. दरम्यान पालखीच्या स्वागतासाठी पुणे शहरातील विविध ठिकाणी फुलांची सजावट, रांगोळ्या, पादुकांचे पूजन, भाविकांचा उत्साह पाहायला मिळाली.

या पार्श्वभूमीवर पोलीस, अग्निशमन दल, पीएमपी, आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवक सज्ज आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता हळूहळू पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असून, पुढील काही दिवस पुणे जिल्ह्यात वारीचा उत्साह अनोख्या भक्तिभावात रंगणार आहे.