May 5, 2024

सामाजिक संपत्ती निर्मात्यांमुळे समाजात समन्वय निर्माण होईल – डॉ अजित रानडे

पुणे, दि २ ऑक्टोबर, २०२३ : सामाजिक संपत्ती निर्मात्यांमुळे व्यक्ती व समाजाचा विकास हा होतोच पण त्याही पुढे जात समाजात एकोपा, बंधुत्व आणि समन्वय खऱ्या अर्थाने निर्माण होतात, असे प्रतिपादन गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थेचे कुलगुरू आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ अजित रानडे यांनी केले. समाजसेवक डॉ विजय बंग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ विजय बंग सामाजिक संपत्ती निर्माता पुरस्कार सोहळ्यात डॉ रानडे बोलत होते.

पद्मविभूषण डॉ के एच संचेती यांच्या हस्ते यावेळी ग्रामीण भागातील मुलींना खेळाच्या माध्यमातून सक्षम बनविणाऱ्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील ‘माणदेशी चॅम्पियन्स’ संस्थेचे संस्थापक प्रभात सिन्हा यांचा यावर्षीचा डॉ विजय बंग सामाजिक संपत्ती निर्माता पुरस्कार देत सन्मान करण्यात आला. पाषाण रस्त्यावरील सेंटर फॉर पोलिस रिसर्च संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. पुरस्काराचे हे सलग दुसरे वर्ष असून मानपत्र, मानचिन्ह आणि रोख रुपये ५१ हजार असे याचे स्वरूप होते.

डॉ विजय बंग यांचे बंधू अशोक बंग, मुलगा डॉ वसंत बंग, सामाजिक कार्यकर्त्या चेतना गाला सिन्हा, पिंपरी चिंचवड महानागरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रो पराग काळकर, अॅड महेश बंग, कमल बागडी याबरोबरच अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.

अमरावतीमध्ये गरीब रुग्णांसाठी डॉ विजय बंग यांनी खूप मोठे काम उभारले. १९७० च्या सुमारास त्यांच्या पुढाकाराने पुढील २५ वर्षे मी व माझे सहकारी त्या ठिकाणी नियमितपणे आरोग्य शिबिरे घेत असू. डॉ विजय यांचे आयोजन आणि रूग्णांप्रती असलेली कणव आजही लख्ख आठवते असे सांगत डॉ संचेती यांनी डॉ विजय बंग यांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले की, “दैनंदिन काम, कुटुंब आणि आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत अनेक जण सामाजिक कार्यात योगदान देत आहेत, अशांचे समाज म्हणून आपण कौतुक करायला हवे. तरुण पिढीने समजकार्यात उतरण्याची आज गरज आहे. या मार्गावरून चालताना अनेक जण प्रोत्साहन देतील अनेक जण तुम्हाला मागेही खेचतील, मात्र माणूस म्हणून आपण समाजासाठी काहीतरी करायला हवे ही जाणीव कायम असून द्या.”

खेळाद्वारे परमेश्वराच्या आणखी जवळ जाता येते हे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. प्रभात सिन्हा हे ग्रामीण भागातील मुलींना खेळाच्या माध्यमातून सक्षम बनवित त्यांना संधी उपलब्ध करून देत असून त्यांच्यासारखे तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे करीत असलेले हे कार्य भूतकाळातील कामापेक्षा महत्त्वाचे आहे असे मत डॉ रानडे यांनी मांडले. सामाजिक संपत्ती ही एक प्रकारे सामाजिक भांडवल असून याचा उपयोग समाजातील समन्वय राखण्यासाठी व्हायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.

ग्रामीण भागातील मुलींमध्ये असलेली कौशल्ये संधीमध्ये रुपांतरीत करण्यासाठी त्यांना योग्य वेळी, योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही करीत असून ‘माणदेशी चॅम्पियन्स’ या संस्थेच्या माध्यमातून आजवर ७ हजार खेळाडू आम्ही घडविले आहेत. आज संस्थेचे १०० खेळाडू हे राष्ट्रीय तर २ ते ३ खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करीत आहेत असे सांगत प्रभात सिन्हा म्हणाले, “आई आणि आजी यांची महिला सक्षमीकरणाची तळमळ मी लहानपणापासून जवळून पाहत आलो. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी परदेशात असताना संघटीत खेळ कसे खेळले जातात हे पाहिले. पुढे क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण आपल्या ग्रामीण मुलींना देखील उपलब्ध व्हावे या हेतून कामाला सुरुवात झाली. आज सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातील म्हसवड सारख्या ठिकाणी आम्ही या सुविधा देऊ शकतो याचा आनंद आहे.”

खेळाडू घडविताना मुलींना स्वत:साठी, स्वत:च्या हक्कासाठी उभे राहण्याची हिंमत देण्यावर आमचा भर असतो. क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षणाने अनेक मुली घडल्या आहेत, त्यांचे व्यक्तीमत्त्व घडले आहे हे मी रोज पाहतो. या सर्व मुली रोज मला प्रेरणा देतात. खेळामुळे समाजातील अनेक अडथळे नाहीसे होऊन महिला सक्षमीकरणाला नवे आयाम मिळू शकतील असा विश्वास प्रभात सिन्हा यांनी व्यक्त केला. लवकरच संस्थेच्या माध्यमातून स्पोर्ट्स इन्क्युबेशन अँड परफॉर्मंन्स प्रोग्रम सुरु करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ वसंत बंग यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद केली. पैशांच्या स्वरूपात असलेली संपत्ती ही खरी संपत्ती नसून या पैशांच्या माध्यमातून समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचे ते एक साधन आहे, असे डॉ बंग म्हणाले. डॉ विजय बंग यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफित देखील यावेळी दाखविण्यात आली. डॉ मोनिका सिंग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अशोक बंग यांनी आभार मानले.