पुणे, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ : दोन वेळा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या व विविध संगीत परंपरांना एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘सोल इंडिया’ या विशेष संगीत महोत्सवाचे आयोजन येत्या २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान पुण्यात करण्यात आले आहे. हरिहरन यांच्या नेटिव्ह कलेक्टिव्ह फाऊंडेशनच्या वतीने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वरझंकारकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती व्हायोलिन अकादमीचे संस्थापक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी कळविली आहे.
संगीतातील विविधतेचा आनंद एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांना अनुभविता यावा ही या महोत्सवाची मूळ संकल्पना असून महोत्सवादरम्यान अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत, गझल, ठुमरी, महाराष्ट्र राज्याचे पारंपारिक संगीत प्रकार आदी संगीत प्रकारांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
पुण्यातील रसिक प्रेक्षक हे नव्या प्रयोगांबाबत कायम सकारात्मक असतात शिवाय मोठ्या मनाने ते अशा प्रयोगांना प्रोत्साहन देखील देतात त्यामुळे ‘सोल इंडिया’ या महोत्सवाच्या आयोजनाला पुण्यापासून सुरुवात करीत असल्याचे गायक हरिहरन यांनी आवर्जून कळविले आहे.
सोल इंडिया महोत्सवाची सुरुवात बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी ‘साज और आवाज’ या कार्यक्रमाने होईल. यामध्ये रामपूर सहस्वान घराण्याचे सुप्रसिद्ध गायक गुलाम नियाझ खान यांचे गायन आणि सुप्रसिद्ध सतारवादक व संगीतकार नीलाद्री कुमार यांचे सतारवादन संपन्न होईल. हा कार्यक्रम कर्वेनगर, डी पी रस्ता येथील बोगनविला फार्म्स या ठिकाणी सायंकाळी ६ वाजल्यापासून संपन्न होईल.
यानंतर शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी ‘साउंड्स ऑफ महाराष्ट्र’ या महाराष्ट्रातील विविध संगीत परंपरांचा अंतर्भाव असलेल्या भव्य अशा विशेष कार्यक्रमाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या या कार्यक्रमात भजन, कीर्तन, नाट्य संगीत, भारुड, लावणी अशा विविध कला प्रकारांचा समावेश आहे. या कार्यक्रमात कलाकारांच्या प्रत्यक्ष सादरीकरणाबरोबरच विशेष निर्मिती केलेल्या दृक-श्राव्य अर्थात ऑडिओ-व्हिज्युअल कंटेंटचा वापर असेल. स्वतः राहुल देशपांडे व प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांचा या कार्यक्रमात सहभाग असेल. कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या प्रांगणात सायंकाळी ५ वाजल्यापासून सदर कार्यक्रम संपन्न होईल.
शनिवार दि. १ मार्च रोजी ‘किंग्ज इन कॉन्सर्ट’ अंतर्गत हरिहरन आणि शंकर महादेवन यांचा विशेष कार्यक्रम संपन्न होईल. ‘किंग्स इन कॉन्सर्ट’ या बॉलीवूड चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रमात स्वतः पद्मश्री हरिहरन व सुप्रसिद्ध गायक – संगीतकार शंकर महादेवन यांचे भव्य वाद्यवृंदासोबत स्वतंत्र व नंतर एकत्र होणारे गायन चित्रपट संगीताच्या रसिकांसाठी एक पर्वणीच ठरेल. सायंकाळी ६.३० वाजल्यापासून कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या प्रांगणात याचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे.
सोल इंडिया महोत्सवाचा ‘श्याम ए मेहफिल’ हा पुण्यातील शेवटचा कार्यक्रम रविवार दि. २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून विमाननगर येथील फिनिक्स मार्केट सिटी येथे संपन्न होईल. गझल व ठुमरी या खास संगीत प्रकारासाठींच्या या विशेष कार्यक्रमात नव्या पिढीतील आश्वासक कलाकार सम्राट पंडित व मधुबंती बागची हे ठुमरी सादर करतील तर पृथ्वी गंधर्व व प्रतिभा सिंघ बघेल यांचे गझल गायन होईल. महोत्सवाची सांगता संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ गायक, संगीतकार पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या गायनाने होईल.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार