June 22, 2025

खराडीतील सोसायटीला एसटीपीचे पाणी दिले, गुन्हा दाखल होणार

पुणे, २७ डिसेंबर २०२४ : खराडी येथील न्याती एलिसीया सोसायटीला खासगी टॅंकर पुरवठादाराकडून महापालिकेच्या एसटीपीचे पाणी पिण्यासाठी पुरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अखेर पोलिसांनी सोसायटीची तक्रारीची दखल घेतली आहे. या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येणार अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी महापालिकेकडूनही कोणती कलमे लावणे अपेक्षीत आहे याची विचारणा पोलिसांंकडून शुक्रवारी महापालिकेस करण्यात आली. त्यानुसार,पालिकेच्या विधी विभागाकडून सार्वजनिक आरोग्यास धोका पोहचविण्यासह इतर काही कलमांची माहिती खराडी पोलिसांना कळविण्यात आली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मागील आठवडयात खराडीत हा प्रकार घडला होता. त्यानंतर खराडी गृहनिर्माण सोसायटी कल्याण संघटनेच्या वतीने खराडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारही दाखल केली होती. मात्र, त्यानंतर काहीच हालचाल झालेली नव्हती. मात्र, गुरूवारी माध्यमांमध्ये या बाबतचे वृत्त प्रसिध्द होताच तत्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली.