पुणे, २४ जानेवारी २०२५ : कर्वेनगर परिसरातील पाणंद रस्त्याच्या दीर्घकाळ प्रलंबित रुंदीकरणासाठी अखेर गुरुवारी महापालिकेने धडक कारवाई केली. यात सुमारे ६० हजार चौरसफूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. येथील राडारोडा हटवून आठ ते पंधरा दिवसात रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण केले जाईल. त्यामुळे येथील ‘बॉटलनेक’सुटून रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुरुवारी सिद्धिविनायक कॉलेज व कमिन्स कॉलेज मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच काही जागेचा ताबा घेण्यात आला.या कारवाईत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची सीमाभिंत आणि परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. हा रस्ता रुंद करण्यासंदर्भात नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती.
हा पाणंद रस्ता राजाराम पूलाकडे पुरेसा रूंद आहे. मात्र, कमिन्स कॉलेज परिसरात अतिक्रमणे व सीमाभिंतींमुळे अवघा नऊ ते दहा फूट इतकाच उरला होता. या रस्त्यावरून बस जात असल्याने तसेच हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करणे अत्यावश्यक होते. मात्र, हे रुंदीकरण दीर्घकाळ रखडले होते. अखेर मागील काही दिवस संबंधित जागामालकांच्या, दुकानदारांच्या बैठका घेत यावर मार्ग काढण्यात आला. अनधिकृत बांधकामे पाडली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.
गुरुवारी सकाळी पथ, बांधकाम, अतिक्रमण निर्मूलन, भूसंपादन आदी विभागांनी एकत्रित कारवाई केली.२५ ते ३० ठिकाणी कारवाई करत सुमारे ५५ ते ६० हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित कारवाई मार्गी लागण्यासाठी काही दिवसांपासून संबंधितांना विश्वासात घेण्यात आले. काहींनी स्वत:हून जागा मोकळी केली. आठ ते पंधरा दिवसात रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण होईल व प्रशस्त रस्ता वापरासाठी खुला होईल,’असे पालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईबाबत भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महापालिकेचे अभिनंदन केले आहे.
त्यातच या रस्त्यावर तीन महाविद्यालये असल्याने त्यांच्या वेळेतही कोंडीचा सामना करावा लागत होता. या बाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही महापालिकेकडे तक्रारी केल्या. त्यानंतर प्रशासनाने या रस्ता रुंदीकरणासाठी संबंधितांना नोटीसही दिल्या. त्यानुसार प्रशासनाने गुरुवारी कारवाई केली. यात कर्वे शिक्षण संस्थेची भिंत तसेच रुंदीकरणात येत असलेली आठ ते दहा बांधकामे काढत रस्त्याचे रुंदीकरण केले.
More Stories
पुणे: आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरवात…विद्यार्थ्यांचे औक्षण करून,साखर वाटून स्वागत
पुणे: राज्याचे माजी मंत्री तान्हाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण
अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य….