October 3, 2024

स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ प्रभा अत्रे यांच्या जयंतीनिमीत्त १३ सप्टेंबर रोजी ‘स्वर नृत्य प्रभा’चे आयोजन

पुणे, दि. ९ सप्टेंबर, २०२४ : स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ प्रभा अत्रे यांच्या जयंतीनिमीत्त पुण्यातील कलावर्धिनी ट्रस्टच्या वतीने शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी, टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे सायं ६ वाजता ‘स्वर नृत्य प्रभा’ या नृत्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. कार्यक्रमस्थळी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.

भरतनाट्यममधील संशोधन आणि अनेकविध प्रयोग यासाठी भरतनाट्यम गुरु डॉ सुचेता भिडे चापेकर ओळखल्या जातात. सुचेताताईंनी केलेल्या विविध प्रयोगांमध्ये भरतनाट्यम आणि हिंदुस्थानी संगीतातील एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे ‘नृत्यगंगा’ हा होय. या प्रयोगामध्ये वेळोवेळी अनेक दिग्गज कलाकार सुचेताताईंसोबत सहभागी झाले आहेत. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यादेखील यांपैकीच एक.

डॉ सुचेताताई आणि डॉ प्रभा अत्रे या दोघींमध्ये कायमच कलात्मक बंध होता. डॉ प्रभा अत्रे यांना सुचेता ताई यांचे मनमोहक नृत्य आवडायचे तर सुचेता ताई यांना प्रभाताई यांचे संगीत. दुर्दैवाने यावर्षी डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यामुळे डॉ प्रभा अत्रे यांसारख्या कलाकाराला नृत्यामधून आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने कलावर्धिनी ट्रस्टच्या वतीने ‘नृत्यगंगा’ या प्रयोगाचे पुनरुज्ज्न करीत ‘स्वर नृत्य प्रभा’ या डॉ अत्रे यांच्या संगीत रचनांवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती कलावर्धिनीच्या अध्यक्षा अरुंधती पटवर्धन यांनी दिली आहे. यावेळी भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आणि किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील असेही पटवर्धन यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे नातू आणि किराणा घराण्याचे गायक विराज जोशी हे आपल्या गायनाने डॉ प्रभा अत्रे यांना आदरांजली वाहतील. तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ सुचेता भिडे चापेकर व त्यांच्या शिष्या डॉ अत्रे यांच्या संगीत रचनांवर नृत्यप्रस्तुती करतील. यावेळी ऋषिकेश बडवे (गायन), आशय कुलकर्णी (तबला), यशवंत थिटे (संवादिनी), कृष्णा साळुंखे (पखावज) व सुनील अवचट (बासरी) हे साथसंगत करतील.