October 5, 2024

सामान्य ते असामान्य कार्यक्रमात उलगडणार डॉक्टर धामणे दाम्पत्याच्या सामाजिक कार्याचा प्रवास

पुणे, दि. २३ सप्टेंबर, २०२४ : पुण्यातील पी. एम. शहा फाऊंडेशन व वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुत्क विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या सामान्य ते असामान्य या प्रकट मुलाखत व संवाद कार्यक्रमामध्ये यावेळी डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे या दाम्पत्याच्या सामाजिक कार्याचा प्रवास उलगडणार आहे. येत्या शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायं ४ वाजता सेनापती बापट रस्त्यावरील वर्धमान प्रतिष्ठान येथे सदर कार्यक्रम संपन्न होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती पी एम शहा फाऊंडेशनचे संचालक ॲड चेतन गांधी यांनी कळविली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना ॲड चेतन गांधी म्हणाले, “घर आणि मन हरवलेल्या माणसांचे गाव निर्माण करणाऱ्या माऊली सेवा प्रतिष्ठान या अहमदनगर येथील संस्थेची स्थापना डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांनी केली. या संस्थेच्या माध्यमातून निराधार, मानसिक व शारीरिकदृष्ट्‌या आजारी आणि अत्याचाराने पीडित अशा महिलांच्या पोटी जन्मलेल्या मुलांची आजीवन काळजी, उपचार आणि पुनर्वसन असे सेवाकार्य केले जाते. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सौ. सुचेता धामणे हे संस्थेतील माता भगिनींची काळजी तर घेतातच परंतु त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार त्यांच्यामध्ये सर्वांगिक विकास कसा होईल व त्यांना या मानसिक आजारातून व आघातातून कसे बरे करता येईल, त्यांच्यात नवीन ऊर्जा व आत्मविश्वास कसा प्रस्थापित होईल याची देखील काळजी घेतात. याच दाम्पत्याच्या या सेवाभावी वृत्तीचा प्रवास इतरांसमोर यावा या उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत.”