पुणे, १५ मार्च २०२५ः पुणे-नगर रसत्यावरील खराडी ते वाघोलीपर्यंत वाहतूक कोंडी मुक्तीसाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे नगर रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत फेब्रुवारी ते मार्च महिन्यातील कॉरीडोर मधला वेग हा १६ ते १९ टक्क्याने वाढला असून वाहतूक शाखेकडून केलेल्या सुधारणा व कारवाईमुळे परिस्थिती बदलत आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पुढाकारातून नगर रस्त्यावरील येरवडा, विमानतळ, खराडी, वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अमितेश कुमार यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी, यांनी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच योग्य त्या उपाय योजना वाहतूक शाखेकडून करण्याबाबत सूचना केल्या होत्या.
सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) व मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून नगर रस्त्यावरील वाहतूक समस्यांचे अभ्यास करून, कोंडी कमी करत वाहतूकीचा वेग वाढविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर सिंगल फेज बदल, चौक सुधारणा तसेच काही राईट टर्न व यु टर्न यामध्ये बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना ः
– येरवडा, शास्त्रीनगर चौकातील कल्याणीनगर कडे जाणाऱ्या राईट टर्नमुळे मुख्य पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती
– हा राईट टर्न बंद करून पुढे यु टर्न दिल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा वेग निरंतर राहीला व होणारी वाहतूक कोंडी कमी करणे शक्य झाले
– वडगाव शेरी चौकात पुण्याकडून नगर कडे जाताना राईट टर्न वरून वडगाव शेरी कडे जाणाऱ्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती
– अग्निबाज गेटच्या समोर यु टर्न दिला तसेच नगर रोडकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना मेट्रो पिलर क्रमांक ४२२ /४२३ येथून यु टर्न दिला
– हा बदल व्हेकल काऊंट व चौकात सिग्नल मुळे मुख्य रस्त्याला होणाऱ्या कोंडीचा अभ्यास करून करण्यात आला आहे
– यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा वेग निरंतर राहण्यास मदत झाली
– विमाननगर चौक (फिनिक्स मॉल) येथे राईट टर्नमुळे मुख्य रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी होत होती
– हा राईट टर्न बंद करून चौक सिग्नल विरहीत करण्यात आला व सोमनाथनगर चौक येथे यु टर्न करण्यात आला आहे
– तसेच नगरकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना विमाननगरकडे अग्निबाज गेट येथून यु टर्न दिल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करणे शक्य झाले
– खराडी दर्गा चौक राईट टर्न बंद केला असून, आपले घर बस स्टॉप पासून यु टर्न केल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक सिग्नल विरहीत झाली आहे, तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यात यश मिळाले आहे.
आधुनिकसिग्नल प्रणाली-
“एटीएमएस या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीद्वारे वाहतूकीचा फ्लो पाहून करण्यात आलेल्या विश्लेषणाद्वारे नगर रस्त्यावरील वाहतूकीचा वेग गेल्या वर्षीच्या जानेवारी ते फेब्रुवारीच्या तुलनेत यावर्षी १६ ते १९ टक्क्याने वाढल्याचे निदर्शनास येत आहे. हे या सुधारणांमुळे शक्य झाले आहे. पुणे शहरातील आणि पुणे-नगर रस्त्यावरील करण्यात आलेल्या रस्ते सुधारणा कार्यक्रमांतर्गत तसेच वाहतूक नियमनांच्या दृष्टीने करण्यात आलेल्या वाहतूक नियमन व कारवाई आणि उपाययोजनांमुळे वाहतूकीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे. सध्या हे बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात आले असून, महानगरपालिकाच्या समन्वयातून पुढील यु टर्न, राईट व लेफ्ट टर्न व चौक सुधारणा यामध्ये कायमस्वरुपी बदल करण्यात येणार आहेत. पुणे-नगर रस्त्यावरील विभागांकडून जानेवारी ते १० मार्चपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये चुकिच्या दिशेने वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे, ट्रिपल सिट, नो पार्कींग, सिग्नल तोडणे अशा विविध प्रकारच्या सुमारे ३४ हजार ३११ कारवाया करण्यात आल्या, ज्यातून २ कोटी ४८ हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. ” असे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.
वाघोलीत विशेष कारवाई –
वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या अनुषंगाने विशेष कारवाई करण्यात आली. वाघोली परिसरामध्ये १ अधिकारी व ३० ते ३५ पोलीस अंमलदार यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या विशेष मेहिमेमध्ये बेशिस्त वाहन चालकांवर आतापर्यंत ४ हजार ८८१ कारवाया झाल्याअसून त्याद्वारे २५ लाख दंड आारण्यात आला आहे.
More Stories
फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान, दुमजली उड्डाणपूलाचे श्रेय घेण्यासाठी आजीमाजी आमदार सरसावले, राज्य सरकारने दिली मंजूरी
पुण्यातील टेकड्यांना हात लावू देणार नाही, ग्रीन पुणे मुव्हमेंटचा इशारा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी