May 10, 2024

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ

पुणे,१७/०९/२०२३: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ झाली असून, गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येनेे नागरिक मूळगावी निघाल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला.

गणेशोत्सवानिमित्त मुंबई, नवी मुंबई, ठाणे भागातील अनेकजण मूळगावी जातात. कोकण, तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा भागात जाणारे नागरिक मोटारीतून मूळगावी निघाले. द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने मोटारी आल्याने वाहतूक संथ झाली.

आडोशी बोगदा ते खंडाळा (एक्झिट) वाहतूक विस्कळीत झाली होती. घाटक्षेत्रात वाहतूक संथगतीने सुरू असल्याने कोंडी सोडविण्यासाठी खंडाळा महामार्ग पाेलीस, बोरघाट पोलिसांचे पथकाकडून काम सुरू होते. शनिवारी सायंकाळपासून द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

गणेशोत्सवानिमित्त मूळगावी निघालेल्या नागरिकांना टोलमाफीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पोलीस ठाण्यातून वाहनांना तात्पुरत्या स्वरुपाचे टोलमाफी परवाने दिले जात आहे. लोणावळ शहर पोलीस ठाण्यात परवाने उपलब्ध असल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली.