November 5, 2025

पुणेकरांसाठी वाहतुकीचा दिलासा; हडपसर–सासवड मेट्रो मार्गांना मंजुरी

पुणे, ४ नोव्हेंबर २०२५: पुणेकरांसाठी वाहतुकीच्या सोयीसाठी आणखी एक मोठी पायरी पार करण्यात आली आहे. पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत प्रस्तावित हडपसर–लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो–सासवड रोड या दोन उपमार्गिकांना अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

दोन्ही उपमार्गिकांची एकत्रित लांबी सुमारे १६ किलोमीटर असून त्यावर १४ उन्नत स्थानके उभारली जाणार आहेत. या दोन प्रकल्पांचा अंदाजित खर्च ५,७०४ कोटी रुपये असून, त्यांची अंमलबजावणी महा मेट्रो मार्फत करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, “या दोन्ही उपमार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड परिसरातील नागरिकांना थेट मेट्रो जोडणी मिळेल. वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनेल. पूर्व पुणे आणि त्याच्या ग्रामीण परिसरालाही या मेट्रो सेवेमुळे फायदा होणार आहे. हे दोन प्रकल्प पुणेकरांच्या जीवनमानात मोठा बदल घडवतील.”

या निर्णयामुळे पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे विस्तारित होणार असून, लाखो प्रवाशांना दररोज जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल. यासोबतच वाहतुकीवरील ताण कमी होऊन प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासही मदत होईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

मुख्य वैशिष्ट्ये:
हडपसर–लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो–सासवड रोड या दोन उपमार्गिकांना शासनाची मंजुरी
एकूण लांबी १६ किमी; १४ उन्नत स्थानके उभारली जाणार
अंदाजित खर्च ५,७०४ कोटी रुपये; अंमलबजावणी महा मेट्रोकडून
पूर्व पुणे, फुरसुंगी, लोणी काळभोर, सासवड परिसराला थेट मेट्रो सुविधा
प्रवासाचा वेळ आणि प्रदूषणात घट; वाहतूक कोंडीपासून दिलासा