May 5, 2024

‘स्वराभिषेक’ कार्यक्रमाद्वारे पंडित जितेंद्र अभिषेकी यांना अभिवादन

पुणे, दि. २९ मार्च, २०२४ : पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या, संगीतबध्द केलेल्या, रचलेल्या रचना बंदिशी, पदे, गीते यांचे प्रभावी सादरीकरण असलेल्या ‘स्वराभिषेक’ या कार्यक्रमाने १८ व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा आजचा पहिला दिवस रंगला.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या रचनांचे सादरीकरण गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे शिष्य व सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर, भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य व प्रसिद्ध गायक आनंद भाटे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ राजा काळे यांनी केले.

उज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेला पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न होत आहे. यावेळी पहिल्या दिवशी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाले.

महोत्सवाचे आयोजक आणि  पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं शौनक अभिषेकी, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी विरोधी पक्ष नेते उज्ज्वल केसकर,  सुप्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले, ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास, व्यास यांच्या पत्नी अनुराधा व्यास, सुप्रसिद्ध गायिका विदुषी देवकी पंडीत, गायिका सानिया पाटणकर, गोविंद बेडेकर, बढेकर समूहाचे प्रवीण बढेकर, आपला परिसर संस्थेचे अध्यक्ष महेश पानसे, विदयेश रामदासी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावर्षी महोत्सवासाठी बढेकर गृप आणि विलास जावडेकर डेव्हलपर्स, लोकमान्य मल्टपर्पज को ऑपरेटिव्ह बँक लि., अंशुमन टेक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

सुरुवातीला पंडित रघुनंदन पणशीकर यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकातील तराणा प्रस्तुत केला. ७५ हून अधिक कट्यारच्या प्रयोगात छोटा सदाशिवची भूमिका करताना हा स्वतः अभिषेकी बुवांनी शिकवल्याची आठवण पणशीकर यांनी सांगितली. यानंतर त्यांनी अभिषेकी बुवांची राग रागेश्री मधील ‘ मोरा मन बस करो लिनो श्याम…’ ही बंदिश सादर केली. यानंतर त्यांनी ‘ गुंतता हृद्य हे…’ हे पद सादर केले. ‘नामाचा गजर’ या अभंगाने त्यांनी समारोप केला. त्यांना निखिल फाटक (तबला), पंडित सुधीर नायक (संवादिनी), ज्ञानेश्वर दुधाने ( पखावज), सौरभ काडगांवकर (गायन), शुभम खंडाळकर, राधिका जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

यानंतर पंडित आनंद भाटे यांनी राग मारुबिहाग सादर केला. यामध्ये त्यांनी आपले गुरू भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची मध्य लयीतील बंदिश सादर केली. यानंतर त्यांनी ‘मज धार परी मोरी नाव’ ही द्रुत बंदिश प्रस्तुत केली. ‘बाली उमरिया मोरी… ही अभिषेकी बुवांची बंदिश सादर करीत त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी राग यमन मध्ये सादर केलेल्या ‘देवाघरचे ज्ञात कुणाला… ‘ या नाट्यपदाला उपस्थितांनी दाद दिली. यानंतर त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांची कट्यार मधील राग पुरीया कल्याण मधील ‘मुरलीधर श्याम हे नंद लाल’ ही रचना सादर केली. यामधून पंडित जितेंद्र अभिषेकी यांची प्रतिभा आपल्यासमोर उभी राहते असेही भाटे म्हणाले. ‘ अबीर गुलाल उधळीत रंग…’ या अभंगाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना निखिल फाटक (तबला), पंडित सुधीर नायक (संवादिनी), ज्ञानेश्वर दुधाने (पखावज), करण देवगावकर व आशिष रानडे (तानपुरा), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.

स्वराभिषेक कार्यक्रमाचा समारोप डॉ राजा काळे यांच्या सादरीकरणाने झाला. अभिषेकी बुवा हे थोर गायक होते, थोर गुरू होते. त्यांनी मुक्त हस्ते विद्यादान केले असे सांगत डॉ राजा काळे म्हणाले, “अभिषेकी बुवांनी विद्या मिळविताना ती कोण्या एका घराण्याची विद्या म्हणून आत्मसात केली नाही. त्यांनी गाण्याचे गाणेपण जपण्यासाठी विद्या मिळविली. गाण्यात स्वरनाट्य असते असे ते कायम म्हणायचे.  संगीत हे अविनाशी तत्त्व आहे त्यामुळे गाण्यात आर्तता असायला हवी. ही आर्तता असेल तर गाणे कसदार होते असे ते म्हणायचे.ज्यापद्धतीने पाकशास्त्रात मन लावून एखादी गोष्ट बनवावी लागते तसेच गाण्यात मन असेल, आर्तता असेल तर रस येतो.”

नव्या पिढीला चांगले संगीत निर्माण करायचे असेल तर त्यांनी परंपरेचा गाभा ओळखून अभ्यास करायला हवा. सोशल मीडियावर व्यक्त होऊन कोणी संगीतकार होत नसतो. कलाकार हा साधनेने मोठा होतो. जी परंपरा तो जोपासतो त्या परंपरेने तो मोठा होतो असेही डॉ काळे म्हणाले. बुवांचे आणि माझे विचार समांतर होते म्हणून आमच्यात चांगला संवाद होता असेही डॉ काळे यांनी नमूद केले

यावेळी राग स्वानंदी सादर करीत डॉ काळे यांनी आपल्या गायनसेवेला सुरुवात केली. ‘तुम बिन जियरा मानत नाही…’ ही रचना त्यांनी प्रस्तुत केली. डॉ काळे यांना निखिल फाटक (तबला), पंडित सुधीर नायक (संवादिनी), ज्ञानेश्वर दुधाने (पखावज), सत्यजित बेडेकर व श्याम जोशी (गायन व तानपुरा) यांनी साथसंगत केली 

रवींद्र खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.