December 13, 2024

जागतिक वारसा नामांकन प्रचारासाठी सिंहगडावर दुचाकी रॅली संपन्न

पुणे, 12 ऑगस्ट 2024: जागतिक वारसा नामांकन प्रचार, प्रसारासाठी पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून सिंहगडावर दुचाकी रॅलीच्या आयोजन करण्यात आले आणि प्रचार मोहिमेची सुरूवात करण्यात आली .

महाराष्ट्राची अस्मिता, अभिमान असलेले भारताचे मराठा लष्करी भूप्रदेश आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकानासाठी प्रस्तावित केले आहेत. या नामांकनाचे साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळाली आहे. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.विलास वाहणे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, भगवा ध्वज, तिरंगा ध्वज फडकवीत स्वच्छतेचा नारा देऊन जनजागृती प्रसारच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत. यासाठी युनेस्कोची प्रतिनिधी मंडळ समिती सदस्य येत्या ऑक्टोबरमध्ये किल्ल्यांना भेटी देणार आहे. यादरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रचार प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे. सिंहगडावरील वाहनतळ येथून १०० मोटरसायकल घेऊन जनजागृती रॅली पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून काढण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी डॉ. वाहणे यांनी सर्व गडप्रेमी, सामाजिक संस्था, नागरिक यांना जागतिक वारसा म्हणून १२ गडकिल्यांचे नामांकन करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन केले. उपस्थित गडप्रेमी, नागरिक, पुरातत्व विभागाचे सहकारी, सामाजिक संस्था प्रतिनिधी यांनी गड किल्ल्याची स्वच्छता राखणे व जागतीक वारसा नामांकनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी शपथ घेतली.

या उपक्रमात, भारत पुरातत्व विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकारी पुणे, वनविभाग पुणे, आम्ही पुणेकर, स्वान, वुई फाउंडेशन आदींनी सहभाग घेतला. मोहीमेचे आयोजन आम्ही पुणेकरच्या सहकार्याने करण्यात आहे. १०८ चे डॉक्टर प्रियांक जावळे, रायडर्स ऑफ दख्खन, हेल्प रायडर्स हेदेखील रॅलीमध्ये सहभागी झाले होते.