May 5, 2024

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. २९ सप्टेंबर २०२३: वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केल्याच्या रागातून डेक्कन येथील दोघांनी महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना सुमारे दोन तास डांबून ठेवले. अंगावर कुत्रे सोडले. शेवटी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी या महिला कर्मचाऱ्यांची सुटका केली. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, डेक्कन उपविभाग अंतर्गत महिला तंत्रज्ञ करुणा आढारी व रूपाली कुटे बुधवारी (दि. २७) दुपारी ३.१५ वाजता प्रभात रोड परिसरात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे शासकीय कर्तव्य बजावत होत्या. दरम्यान सरस्वती अपार्टमेंटमधील वीजग्राहक आरती ललित बोदे यांच्याकडे ५ हजार २०६ रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर ग्राहकाकडून तात्काळ वीजपुरवठा सुरु करण्यास ऑनलाइन वीजबिल भरण्यास नकार देण्यात आला व धनादेश स्वीकारण्यास सांगण्यात आले. मात्र आम्हाला स्वतः धनादेश स्वीकारता येत नाही असे या महिला तंत्रज्ञांनी सांगितल्यावर आरती बोदे व ललित बोदे यांनी त्यांना शिविगाळ सुरु केली. नाईलाजाने या महिला तंत्रज्ञ तिसऱ्या मजल्यावरून खाली जाण्यास निघाल्या असता त्यांना लिफ्टमधून जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर त्या जिन्यातून जात असताना बोदे व वॉचमनकडून जिन्याचे सेफ्टी डोअर बंद करण्यात आले. त्यामुळे या दोघी तंत्रज्ञ जिन्यात अडकल्या. त्याचवेळी त्यांच्यावर दोन कुत्रे सोडण्यात आले. कुत्रे त्यांच्यावर भूंकत असताना आढारी व कुटे यांनी तात्काळ महावितरणच्या कार्यालयात व पोलिस ठाण्यात संपर्क साधला.

या प्रकारानंतर महावितरणचे स्थानिक कार्यालयातील अभियंते व अनेक कर्मचारी या इमारतीमध्ये आले. त्यांनी डांबून ठेवलेल्या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना सोडण्याची विनंती केली. मात्र त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने दाखल झाले व दुपारी ४.२५ वाजता या दोन्ही महिला तंत्रज्ञांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी महावितरणकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर डेक्कन पोलीस ठाण्यात आरोपी ललित बोदे व आरती ललित बोदे विरुद्ध भादंवि ३५३, ३४१, ३४२, ५०४, ३४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १०६ व ११७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.