October 26, 2025

पुणे महापालिकेत नागरीकांसाठी “अभ्यागत कक्ष’

पुणे, २७ जानेवारी २०२५ ः महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयामध्ये विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांसाठी आता “अभ्यागत कक्ष’ सुरु करण्यात आला आहे. संबंधित कक्षामध्ये विभागाकडुन देण्यात येणाऱ्या विविध सेवा व कागदपत्रांची माहिती क्‍युआर कोडच्या माध्यामातुन नागरीकांना मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या सात कलमी कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व शासकीय संस्थांना दिले होते. शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांसाठी अद्ययावत सोई-सुविधायुक्त अभ्यागत कक्ष सुरु करण्याच्याही सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयातील विकास योजना व बांधकाम परवानगी परवाना विभागातील विविध सेवा, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती नागरीकांना सहज व्हावी, यासाठी शहर अभियंता कार्यालयाच्या प्रवेश दालनात अभ्यागत कक्ष सुरु करण्यात आला आहे. याबरोबरच विभागात किऑस्क ठेवण्यात आला आहे. त्यावरील क्‍युआर कोडद्वारे वैयक्तीक भोगवटा पत्र, विकास आराखड्याचा भाग नकाशा,गुंठेवारी, इमारत बांधकाम मान्यता, लेआऊट मान्यता, टीडीआर मान्यता, हवाई दलाचे ना हरकत प्रमाणपत्र याबाबतच्या कागदपत्रांची माहिती नागरीकांना मिळणार आहे. संबंधित अभ्यागत कक्ष व किऑस्क सुविधेचे उद्‌घाटन महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी झाले.