November 5, 2025

पुणे शहरातील पाणीकपात रद्द; बुधवारपासून नियमित पाणीपुरवठा सुरू

पुणे, ६ मे २०२५: दक्षिण पुण्यात लागू करण्यात आलेली आठवड्यातील एक दिवसाची पाणीकपात महापालिकेने दुसऱ्याच दिवशी रद्द केली असून बुधवारपासून संबंधित परिसरात नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिक व राजकीय पक्षांच्या विरोधानंतर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाला पाणीकपात रद्द करण्याचे आदेश दिले.

वडगाव जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या सिंहगड रस्ता, सातारा रस्ता आणि परिसरात सोमवारी पासून चक्राकार पद्धतीने एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय लागू करण्यात आला होता. मात्र, धायरी, वडगाव बुद्रुक, सहकारनगर, कात्रज, कोंढवा बुद्रुकसह अनेक भागांतील नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला.

महापालिकेच्या नियोजनातील त्रुटी आणि वितरणातील अडचणीमुळेच पाणीकपात लागू करण्यात आल्याचा आरोप होत होता. एक दिवसाचा पाणी बंद केल्यानंतर पुढील दोन-तीन दिवस पुरेसा पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि भाजप आमदार भीमराव तापकीर यांनीही प्रशासनाकडे निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती.

पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, “उपलब्ध पाणीसाठा, वाढलेली लोकसंख्या आणि लवकरच येणारा पावसाळा याचा विचार करून पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, वडगाव केंद्राच्या क्षमतेचा फेरआढावा घेतला जाईल आणि आवश्यक उपाययोजनांसाठी जलसंपदा विभाग व महावितरणसोबत समन्वय साधला जाईल.