May 10, 2024

वीजग्राहकांच्या सेवांमध्ये सहजता आणण्याच्या ध्येयाने कार्यरत रहा

पुणे, दि. १६ सप्टेंबर २०२३: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यात सहजता व सुलभता आणण्याचे काम मुख्यत्वे अभियंते करीत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज महावितरणने देखील वीजग्राहकांना ‘इज ऑफ लिव्हिंग’प्रमाणे सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. या सेवेतील सहजता, सुलभता अबाधित ठेवण्याच्या व वाढवण्याच्या ध्येयाने कार्यरत रहा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले.

राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त शुक्रवारी (दि. १५) रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. पवार यांच्याहस्ते पुणे परिमंडलातील उत्कृष्ट २५ अभियंत्यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्हे प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) सौ. माधुरी राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, भारताला अभियांत्रिकीचा उज्ज्वल व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याच बळावर भारताने चांद्रयान, सौरयान मोहिमांद्वारे जगात तंत्रज्ञानाचा नवा मानदंड तयार केला आहे. कोणतेही स्वप्न तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकारण्याचे कसब व दृष्टी अभियंत्यांकडे असते. त्यामुळे आता मूलभूत गरज बनलेल्या वीज क्षेत्रात देखील महावितरणच्या अभियंत्यांनी ग्राहक सेवा देताना सामाजिक जाणि‍वेने व बांधिलकीने कार्यरत राहावे असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमामध्ये, उत्कृष्ट कामगिरी करणारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता– दिलिप मदने, अशोक जाधव, सुधीर पण्णीकर, संजय मालपे, विश्वास भोसले, प्रमोद गायकवाड, उपकार्यकारी अभियंता– डॉ. संतोष पाटणी, मुकेश जोशी, अभिजित देशपांडे, विजय गारगोटे, अमित शिंदे, निताशा धामणगी, सहायक अभियंता- रत्नदीप काळे, रणजित वाघ, शुभांगी क्षीरसागर, पुजा नायडू, श्रृती रोडे, चेतन टिकले, हर्षद कुलकर्णी, सुप्रिया जोशी, विजय माने, मंगेश सोनवणे, रोहिणी उगिले, हाजीमलंग बागवान, संतोष शिंदे यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता श्री. धनराज बिक्कड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर, प्रणाली विश्लेषक श्री. बाळकृष्ण पाटील आदींसह सर्व विभागीय कार्यालयप्रमुख कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.