May 6, 2024

दि विश्वेश्वर सहकारी बँकेचा सभासदांना १० टक्के लाभांश

पुणे, दि. २३ ऑगस्ट : दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे ची ५२वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच गोल्डन लिफ लॉन्स, डीपी रोड, एरंडवणे, पुणे येथे अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी वर्ष २०२२-२३ करीता सभासदांना १० टक्के लाभांश अदा करण्यास मान्यता देण्यात आली तसेच बँकेच्या इंस्टाग्राम व फेसबुक पेजचे उद्घाटन देखील करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांनी सांगितले की, बँकेने चालू आर्थिक वर्षात गतवर्षाच्या तुलनेत अधिक चांगली व्यवसाय वाढ व सर्वोत्तम वसुली करण्याचा संकल्प केला आहे. सभासद व खातेदारांनी दिलेल्या पाठिंब्यावरच बँकेची प्रगती सुरु आहे, ती तशीच सुरु राहील. बँकेने ऑगस्टमध्ये एकूण व्यवसाय ₹३००० कोटींचा टप्पा पार केला आहे. यावर्षी दिपाळीपूर्वी लातूर व इचलकरंजी येथे बँकेच्या नवीन शाखा सुरु करण्यात येतील. नजीकच्या भविष्यात एकूण व्यवसाय ₹५००० कोटी पर्यंत नेण्याचा निर्धार यावेळी गाडवे यांनी व्यक्त केला.

सभेस संचालक मंडळ सदस्य श्रेयश रुकारी, सुनील रुकारी, मनोज साखरे, राजेंद्र मिरजे, दत्तात्रय कामठे, अमोल मणियार, सुभाष लडगे, अजय डोईजड, रवींद्र महाजन, डॉ. चिंतामणी वैजापूरकर, रत्ना कसबेकर, सुलभा कोकाटे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे आदी मान्यवर उपस्थित होते. उपाध्यक्ष श्रेयश रुकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.