May 6, 2024

पुणे: कोरेगाव पार्कमध्ये एकाच रात्रीत दोन लुटमारीच्या घटना, पादचारी महिलेसह हॉटेल कामगाराची लुट

पुणे, दि. २२/०८/२०२३: कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुडगूस घातला असून पादचार्‍यासह महिलेला लक्ष्य केल्याचे उघडकीस आले आहे. एकाच रात्रीत दोन दिवस लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करुन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २० ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील लेन्स कार्ट बसस्थानकाजवळ घडली आहे. याप्रकरणी पदमा चव्हाण वय ४१, रा. कोरेगाव पार्क यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला २० ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून चालत आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यासोबत पळ काढला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगडे तपास करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी हॉटेलमधील कामगाराला अडवून शस्त्राचा धाक दाखविला. त्याच्याकडील दोन हजारांची रोकड आणि मोबाइल असा ११ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना २१ ऑगस्टला कोरेगाव पार्कमधील बंडगार्डन रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी गणाराम चौधरी वय ३१ रा. ताडीवाला रोड याने कोरेगावपार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी गणाराम हॉटेलमधील काम संपवून घरी चालला होता. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याला शस्त्राचा धाक दाखवून दोन हजारांची रोकड आणि मोबाइल असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आरोपींना अटक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांनी दिली आहे.