May 18, 2024

पुणे परिमंडलातील ३४ लाख वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी ८० कोटींचा परतावा

पुणे, दि. १५ जून २०२३: महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील ३४ लाख ४६ हजार ९७८ लघु व उच्चदाब वीजग्राहकांना ७९ कोटी ९६ लाख ३६ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे. .

मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.

तसेच विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्याप्रमाणे सन २०२२-२३ मध्ये पुणे परिमंडलातील ३४ लाख ४६ हजार ९७८ लघु व उच्चदाब वीजग्राहकांना ७९ कोटी ९६ लाख ३६ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. कृषिपंपधारक वीजग्राहकांना त्रैमासिक वीजबिल देण्यात येत असल्याने त्यांच्या येत्या जून महिन्याच्या वीजबिलात परताव्याची रक्कम समायोजित करण्यात येणार आहे.

लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ३४ लाख ४१ हजार ५७५ वीजग्राहकांना ३९ कोटी २० लाख रूपयांचा परतावा देण्यात आला आहे. यामध्ये पुणे शहरातील १७ लाख ८४ हजार ३६ ग्राहकांना २१ कोटी ६० लाख ९० हजार रुपयांचा, पिंपरी व चिंचवड शहरातील ७ लाख ८८ हजार ९१० वीजग्राहकांना ९ कोटी २२ लाख ८७ हजार तर आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील ८ लाख ६८ हजार ६२९ ग्राहकांना ८ कोटी ३६ लाख २२ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. तसेच पुणे परिमंडलातील उच्चदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक तसेच इतर ५ हजार ४०३ वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी ४० कोटी ७६ लाख ३५ हजार रुपयांचा परतावा वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आला आहे.

पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीतील फरकाची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.