पुणे, ७ मे २०२५ : अत्यंत वर्दळीच्या नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर (एफसी रोड) वारंवार होणाऱ्या अतिक्रमणांविरोधात अखेर बुधवारी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. गुडलक कॅफे, हॉटेल वैशाली, तिरंगा यासह अन्य हॉटेलवर जेसीबीने वार करून अनधिकृत शेड तोडून टाकण्यात आले. यात सुमारे सहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. त्यामुळे नामदार गोखले रस्त्याने काही काळ मोकळा श्वास घेतला.
या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असल्याकडे तसेच महापालिकेच्या स्थिर पथकासमोरच अनधिकृत व्यवसाय चालत आहेत. पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही अतिक्रमणांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. या रस्त्यावरील कोंडीत अतिक्रमणांमुळे भर पडत असल्याचे पत्र डेक्कन पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी पालिकेला दिले होते. यानंतर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी बांधकाम विभागाचाही मदत घेण्यात आली.अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, विभागाचे सहाय्यक आयुक्त सदानंद लिटके, क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट, रणजित मुरकुटे, शाम अवघडे, धम्मानंद गायकवाड आदींच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. ‘ या कारवाईत फ्रंट व साइड मार्जिनसह पदपथावरील विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात फ्रीज, टेबल, कपाट, विक्री साहित्य असे सहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. हाँककाँग लेन ते ज्ञानेश्वर पादुका चौकादरम्यान ही कारवाई करण्यात आली,असे खलाटे यांनी सांगितले.
More Stories
Pune: कोंढवा खुर्दमध्ये १५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामावर हातोडा
Pune: रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे यांची अतिरिक्त पोलीस आयुक्तांसमवेत पाहणी
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त