स्वारगेट, २ नोव्हेंबर २०२६ : पुण्यातील मुकुंदनगर परिसरात एका ३० वर्षीय विवाहितेचा राहत्या घरात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. पती आणि सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. पायल अक्षय झांबरे असे मृत महिलेचे नाव आहे. सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी तिचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
ही घटना मुकुंदनगर येथील अक्षय हाइट्स सोसायटीमधील जुन्या फ्लॅटमध्ये घडली. हा परिसर दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. पायल यांचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती आहे. त्या एका आयटी कंपनीत नोकरी करत होत्या. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांचा अक्षय झांबरे यांच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला चार वर्षांची मुलगी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीपासून पायल बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्या चुलत जावेने याबाबत त्यांच्या भावाला माहिती दिली. त्यानंतर भाऊ ऋषिकेश यांना याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने पायल यांच्या घरी धाव घेतली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून, घटनेचा क्रम समजून घेण्यासाठी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.
सोन्यासाठी दरवर्षी मागणी केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
पायल यांच्या चुलत भावाने, जनार्दन पवार यांनी सासरच्या मंडळींकडून दरवर्षी दिवाळीच्या काळात पाच ते दहा तोळे सोन्याची मागणी केली जात असल्याचा आरोप केला आहे.
यंदा पायल यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी आर्थिक परिस्थितीमुळे सोन्याची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगितले होते. तसेच ही मागणी पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्याची विनंती केली होती, असा दावा पवार यांनी केला.
मात्र, त्यानंतरही पायल यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता आणि त्यांचा शारीरिक तसेच मानसिक छळ केला जात होता, असा आरोप जनार्दन पवार यांनी केला आहे.
या घटनेनंतर पायल यांच्या नातेवाइकांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या मृत्यूमागील परिस्थितीबाबतही कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
पती आणि सासू-सासरे घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पायल यांचे पती, सासरे आणि सासू घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. माहेरच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची पोलीस पडताळणी करत आहेत.
पायल यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या चार वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासातून त्यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

More Stories
हुशार पिढी घडवतोय; पण संवेदनशील माणसं घडवत आहोत का?
धरणसाखळीत पावसाची हजेरी पण दिलासा नाही
२०३० पर्यंत पुणे देशातील सर्वांत मोठे मोबिलिटी हब बनेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास