लेखिका : गायत्री क्षीरसागर | विज्ञान संवादक
पुणे, ०६ नोव्हेंबर २०२६: शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे मंदिर नव्हे, तर मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडवणारी जागा. मात्र अलीकडच्या काळात देशभरातून समोर येणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांमधील हिंसक घटनांनी या पायाबाबतच अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
पुण्यातील बालेवाडी येथे सोशल मीडियावरील व्हिडिओवरून झालेल्या वादातून नववीतील विद्यार्थ्याने वर्गमैत्रिणीवर चाकूने हल्ला केला. मुंबईतील साकीनाका येथे जुन्या वादातून एका नववीतील विद्यार्थ्यावर त्याच्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी कटरने हल्ला केल्याची घटना समोर आली. हरियाणातील पंचकुला येथे आठ वर्षांच्या विद्यार्थ्याने सहा वर्षांच्या मुलीला विटेने मारहाण करून गंभीर जखमी केले. तर आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे एका तरुणाने शाळेच्या वर्गात प्रवेश करून दहावीतील विद्यार्थिनीवर करवतीने हल्ला केला; तिला वाचवण्याच्या प्रयत्नात आणखी एक विद्यार्थिनी जखमी झाली. या घटना केवळ शाळांमधील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत नाहीत, तर मुलांच्या भावनिक जडणघडणीबाबत आणि समाजाच्या बदलत्या मानसिकतेबाबतही गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडतात.
मुलांसोबत काम करताना आलेला माझा एक अनुभव आजही अस्वस्थ करतो. काही महिन्यांपूर्वी एका नामांकित शाळेला भेट दिली असताना, मुख्याध्यापक एका गंभीर प्रकरणाचा निपटारा करत असल्याचे पाहिले. सहावीतील एका मुलाला नववीतील मुलगी आवडत होती. तिने नकार दिल्यानंतर त्या मुलाने शार्पनरमधील ब्लेडने तिच्या हातावर ओरखडे काढल्याची घटना घडली होती. एका मुलाला नकार स्वीकारता येत नाही, ही बाब मला अधिक अस्वस्थ करणारी होती.
दहा वर्षांपूर्वी महानगरपालिका शाळांमध्ये उन्हाळी इंटर्नशिप कार्यक्रमांचे समन्वयन करत असतानाचे दिवस आठवतात. अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतून येत होते. प्रत्येक पालकाकडे मोबाईल फोन असेलच असे नव्हते. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर मुलं सुरक्षितपणे घरी पोहोचली का, हीच आमची आणि पालकांची प्रमुख चिंता असायची. आज मात्र मुलांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक जडणघडणीची चिंता अधिक प्रकर्षाने जाणवते.
मुलं नेमकं काय पाहत आहेत, काय ऐकत आहेत आणि काय शिकत आहेत?
आज मुलांच्या हातात माहितीचा प्रचंड साठा आहे. मोबाईल, समाजमाध्यमे, ऑनलाइन गेम्स, चित्रपट आणि बातम्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात. मात्र प्रत्येक माहिती समजून घेण्याची भावनिक परिपक्वता त्यांच्यात असतेच असे नाही. सनसनाटी बातम्या, आक्रमक भाषा आणि हिंसेचे सहज होणारे चित्रण यांचा त्यांच्या विचारांवर काय परिणाम होतो, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
यासोबतच बदलती कुटुंबरचना, विभक्त कुटुंबपद्धती, पालकांची धावपळ आणि मुलांसोबत कमी होणारा संवाद हेही विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. अर्थात, प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगळी असते; परंतु मुलांना मनमोकळेपणाने बोलता येईल, प्रश्न विचारता येतील आणि आपल्या भावना व्यक्त करता येतील असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.
मुलांना प्रेम, नकार, मैत्री, आकर्षण, मतभेद आणि वैयक्तिक मर्यादा यांची जाणीव योग्य वयात करून देणे गरजेचे आहे. एखाद्याने ‘नाही’ म्हटल्यास तो नकार स्वीकारणे, राग आल्यावर हिंसेचा आधार न घेणे आणि दुसऱ्याच्या भावनांचा आदर करणे हे संस्कार केवळ पुस्तकांतून रुजत नाहीत.
प्रश्न केवळ मुलांचा नाही; आपण प्रौढ म्हणून कोणता आदर्श ठेवतो आहोत?
शाळांमधील असहिष्णुता आणि हिंसेबद्दल बोलताना आपल्या आजूबाजूच्या प्रौढ जगाकडेही पाहावे लागेल. कामाच्या ठिकाणी होणारे राजकारण, एकमेकांना कमी लेखणे, मतभेद सहन न होणे, श्रेयासाठीची स्पर्धा, मानसिक दबाव आणि अपमानास्पद वर्तन हे अनेकांच्या दैनंदिन अनुभवाचा भाग बनत आहेत.
मुलं केवळ आपण त्यांना काय शिकवतो यावरून घडत नाहीत; तर आपण एकमेकांशी कसे वागतो, हे पाहूनही शिकतात. घरात, शाळेत आणि कामाच्या ठिकाणी आदर, सहिष्णुता आणि संवेदनशीलता यांचा अभाव असेल, तर मुलांकडून वेगळ्या वर्तनाची अपेक्षा कशी करणार?
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करताना एक गोष्ट प्रकर्षाने शिकायला मिळाली आहे. दयाळूपणा म्हणजे कमजोरी नव्हे, सहिष्णुता म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे आणि स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहणे म्हणजे इतरांशी संघर्ष करणे नव्हे. आपली मानसिक शांतता जपत, योग्य गोष्टींसाठी आवाज उठवणे आणि स्वतःचा आत्मसन्मान टिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
आज मानसिक आरोग्याचा प्रश्न केवळ मुलांपुरता मर्यादित नाही. पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि नोकरदार अशा प्रत्येक वयोगटाला मानसिक ताण, अपेक्षा आणि स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे समुपदेशन, भावनिक आधार, संवाद आणि सुरक्षित वातावरण या गोष्टींना शिक्षणव्यवस्थेत आणि कार्यसंस्कृतीतही महत्त्व मिळायला हवे.
मग शिक्षणात नेमके काय कमी पडत आहे?
आज STEM शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भविष्यातील कौशल्यांवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. विज्ञान संवाद आणि STEM शिक्षण क्षेत्रात काम करताना या कौशल्यांचे महत्त्व मला निश्चितच मान्य आहे. मात्र त्याचबरोबर मूल्यशिक्षण, भावनिक बुद्धिमत्ता, सहानुभूती, सहिष्णुता आणि माणुसकी यांनाही तितकेच महत्त्व मिळायला हवे.
मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवताना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य द्यावे; पण त्याचवेळी दुसऱ्याच्या मताचा आदर करायलाही शिकवावे. स्पर्धा करायला शिकवावे; पण दुसऱ्याला हरवून नव्हे, तर स्वतःला अधिक सक्षम करून पुढे जायला शिकवावे. यशस्वी होण्याची स्वप्ने दाखवावीत; पण त्या प्रवासात माणुसकी हरवू नये, याची जाणीवही करून द्यावी.
यासाठी पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन, शिक्षणसंस्था, धोरणकर्ते आणि समाज या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शाळांमध्ये बालसुरक्षा यंत्रणा, नियमित समुपदेशन, भावनिक शिक्षण आणि पालक-शिक्षक संवाद यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर घरांमध्ये मुलांसोबत संवादासाठी वेळ राखणेही आवश्यक आहे.
कारण उद्याचा समाज केवळ तंत्रज्ञानाने प्रगत होऊन चालणार नाही; तो माणुसकीनेही समृद्ध असायला हवा.
आपण मुलांना भविष्यात यशस्वी कसे व्हायचे हे शिकवत आहोत; पण एक चांगला माणूस कसे व्हायचे हे शिकवत आहोत का?
आज प्रत्येक पालकाने, शिक्षकाने आणि जबाबदार नागरिकाने स्वतःला हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

More Stories
धरणसाखळीत पावसाची हजेरी पण दिलासा नाही
२०३० पर्यंत पुणे देशातील सर्वांत मोठे मोबिलिटी हब बनेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
पुणे: मुकुंदनगरमध्ये ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू; हुंड्यासाठी छळ केल्याचा माहेरच्या कुटुंबीयांचा आरोप