पुणे, २ नोव्हेंबर २०२६ : खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. रविवारी सकाळी सहा ते सोमवारी सकाळी सहा या २४ तासांत सर्व धरणांमध्ये पावसाची नोंद झाली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाखळीतील पाणीसाठा ४.८९ टीएमसीने कमी आहे.
या कालावधीत पानशेत धरण परिसरात सर्वाधिक १३ मिलीमीटर पाऊस झाला. वरसगाव येथे ११, खडकवासला येथे आठ, तर टेमघर येथे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली. चारही धरणांतील एकूण पाणीसाठा २३.५१ टीएमसी असून, धरणांची साठवण क्षमता २९.१५ टीएमसी गृहीत धरता तो ८०.६५ टक्के आहे. गतवर्षी २ नोव्हेंबरला हाच साठा २८.४० टीएमसी म्हणजेच ९७.४१ टक्के होता.
सध्या वरसगाव धरणात सर्वाधिक ८५.६३ टक्के पाणीसाठा आहे. त्याखालोखाल टेमघरमध्ये ८४.६३, पानशेतमध्ये ७७.६७, तर खडकवासला धरणात सर्वांत कमी ५६.८२ टक्के पाणी शिल्लक आहे. यंदा एक जूनपासून टेमघर धरण परिसरात सर्वाधिक ३२५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
धरणनिहाय पाणीसाठा व पाऊस
खडकवासला : १.१२ टीएमसी (५६.८२ टक्के); एकूण पाऊस ७९० मिमी.
पानशेत : ८.२७ टीएमसी (७७.६७ टक्के); एकूण पाऊस २३५५ मिमी.
वरसगाव : १०.९८ टीएमसी (८५.६३ टक्के); एकूण पाऊस २२०८ मिमी.
टेमघर : ३.१४ टीएमसी (८४.६३ टक्के); एकूण पाऊस ३२५२ मिमी.

More Stories
हुशार पिढी घडवतोय; पण संवेदनशील माणसं घडवत आहोत का?
२०३० पर्यंत पुणे देशातील सर्वांत मोठे मोबिलिटी हब बनेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
पुणे: मुकुंदनगरमध्ये ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू; हुंड्यासाठी छळ केल्याचा माहेरच्या कुटुंबीयांचा आरोप