पुणे, ०७ नोव्हेंबर २०२६ : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, मांगल्य आणि आपुलकीचा सण! या सणानिमित्त प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण साजरे करत असतो. मात्र, शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा दिवाळीचा सण कुटुंबीयांशिवाय साजरा करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना घरापासून दूर असल्याची उणीव भासू नये, त्यांच्या चेहऱ्यावरही दिवाळीचा आनंद फुलावा आणि विद्यापीठ हे केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता विद्यार्थ्यांसाठी एक कुटुंब बनावे, या भावनेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि विद्यार्थी वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांमध्ये शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी शिक्षणानिमित्त विविध भागांतून पुण्यात आलेले असतात. काही अपरिहार्य कारणांमुळे या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरी जाणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी आणि त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करण्यासाठी दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुलींच्या वसतिगृहात तसेच मुलांच्या वसतिगृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे विद्यार्थ्यांना सणाच्या निमित्ताने आपुलकीचा आणि कुटुंबीयांच्या सहवासाचा अनुभव घेता आला.

या प्रसंगी अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, वसतिगृह प्रमुख डॉ. गीता शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाच्या प्रभारी संचालिका डॉ. सविता कुलकर्णी तसेच राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी संचालक डॉ. गणेश भामे उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या भावनिक गरजा, आनंद आणि समाधान यांचीही विद्यापीठाला जाणीव आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
शिक्षणासाठी घरापासून दूर आलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सणासुदीच्या काळात आनंदाचे काही क्षण निर्माण करणे, त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे आणि विद्यापीठ परिवाराशी त्यांचे नाते अधिक घट्ट करणे, हा या उपक्रमामागील महत्त्वपूर्ण हेतू होता. या उपक्रमाचा लाभ दोन्ही वसतिगृहांतील दिवाळीनिमित्त घरी न गेलेल्या एकूण ६०० विद्यार्थ्यांनी घेतला. फराळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेणारा हा उपक्रम विद्यापीठाच्या विद्यार्थीहितैषी आणि संवेदनशील दृष्टिकोनाचे दर्शन घडवणारा ठरला.

More Stories
लक्ष्मीपूजनानिमित्त ८ नोव्हेंबर रोजी पुणे मेट्रोची सेवा रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार
पुणे: मोहम्मदवाडीतील खासगी जागेवर कचरा टाकून जाळला जात असल्याचा आरोप; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
हुशार पिढी घडवतोय; पण संवेदनशील माणसं घडवत आहोत का?