पुणे, दि. १८ ऑक्टोबर, २०२३ : कामगार हा बांधकाम क्षेत्राचा कणा आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी क्रेडाई पुणे मेट्रो वचनबद्ध असून कामगारांचे कल्याण, त्यांच्या सामाजिक जीवनाची उन्नती आणि आकांक्षा वृद्धीसाठी क्रेडाई पुणे मेट्रोच्या विशेष कामगार कल्याण समितीच्या माध्यमातून आणि प्राईड समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वोत्तम सुविधा पुरस्काराचे वितरण आज आमदार माधुरी मिसाळ, पुण्याच्या कामगार विभागाचे अतिरिक्त आयुक्त शैलेंद्र पोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून राजा बहादूर मिल रस्त्यावरील हॉटेल ग्रँड शेरेटन या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमावेळी पुण्याच्या कामगार विभागाचे सहाय्यक-आयुक्त अभय गीते, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे, उपाध्यक्ष अरविंद जैन, सचिव अश्विन त्रिमल, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य जे पी श्रॉफ, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार पाटील, उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि कामगार कल्याण समितीच्या समन्वयक व कार्यक्रमाच्या निमंत्रक सपना राठी, सह समन्वयक मिलिंद तलाठी व पराग पाटील आदी मान्यवर देखील उपस्थित होते.
यावेळी २१ ते १०० इतकी कामगार संख्या असलेल्या विभागात एस जे कॉन्ट्रॅक्ट्स (प्रकल्प – पूनावाला टॉवर्स) यांना सुवर्ण पुरस्कार तर रोहन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (प्रकल्प – रोहन निदिता) व कोलते पाटील इंटिग्रेटेड टाऊनशिप (प्रकल्प – लाईफ रिपब्लिक) यांना रौप्य पुरस्काराने गौरविण्यात आले. यानंतर १०१ ते ३०० कामगार संख्या असलेल्या विभागात पंचशील रिअल्टीला (प्रकल्प – वॅनटेज टॉवर्स) आणि एस जे कॉन्ट्रॅक्टर (प्रकल्प – एस जे पेबल्स ग्रीनफिल्ड) यांनी सुवर्ण पारितोषिक तर विलास जावडेकर डेव्हलपर्स (प्रकल्प- यशोवन इटर्नीटी) यांनी रौप्य पुरस्कावर नाव कोरले. ३०० हून अधिक कामगार संख्या असलेल्या विभागात प्राईड बिल्डर्स (प्रकल्प- प्राईड वर्ल्ड सिटी) आणि एस जे कॉन्ट्रॅक्टर यांना अमर प्रिस्टीन ४ या प्रकल्पासाठी सर्वोत्तम सुवर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले. तर रोहन बिल्डर्स (प्रकल्प – अभिलाषा फेज २) आणि प्राईड बिल्डर्सला (प्रकल्प – प्राईड सिटी) रौप्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप होते.
यावेळी देण्यात आलेल्या विशेष पुरस्कारांमध्ये पेगॅसिस प्रॉपर्टीज (प्रकल्प – मेगापॉलिस) आणि मंगलम लँडमार्क (प्रकल्प – मंगलम ब्रीज) यांना सर्वाधिक बीओसीडब्लू नोंदणी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. याबरोबरच व्हीटीपी रिअल्टी यांच्या व्हीटीपी बेलिसिमो प्रकल्पाला सर्वोत्तम आरोग्य व स्वच्छता पुरस्कार, के रहेजा कॉर्पोरेशनच्या रहेजा विस्टास प्रकल्पाला सर्वोत्तम कौशल्य विकास पुरस्कार, प्राईड पर्पल इन्फ्रास्ट्रक्चरच्या पार्क डिस्ट्रीक्ट प्रकल्पाला सर्वोत्तम सुरक्षा पुरस्कार, लेगसी लाईफस्पेसेसच्या लेगसी कैरोज प्रकल्पाला सर्वोत्तम नाविन्यता पुरस्कार, अथर्व एन्टरप्राईजेसच्या ट्रू स्पेस प्राईमा प्रकल्पाला सर्वोत्तम महिला कामगार कल्याण पुरस्कार तर आशियाना हाऊसिंगच्या आशियाना मल्हार प्रकल्पाला सर्वोत्तम अंगणवाडी सुविधा पुरस्काराने गौरविण्यात आले.
पीसीईआरएफ हे या पुरस्काराचे नॉलेज पार्टनर असून पीसीईआरएफ आणि सीक्यूआरएमधील ज्युरी सदस्यांच्या तज्ज्ञ समितीने पुरस्कारांचे परीक्षण केले आहे हे विशेष.
यावेळी बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या, “आज बांधकाम व्यावसायिकांनी कारागीर आणि कामगार यांमध्ये फरक समजून घेत आपल्याकडे किती कौशल्याधारित कामगार काम करीत आहेत हे पाहायला हवे. या कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी योग्य आणि पुरेशा सेवा उपलब्ध करून देणे ही बांधकाम व्यावसायिकांची जबाबदारी असून यामुळे बांधकाम प्रकल्पांवर दिसत असलेले चित्र बदलण्यास नक्की मदत होणार आहे. कौशल्यपूर्ण कामगारांची गरज लक्षात घेत त्यांच्या कौशल्य विकासाचाही विचार होणे महत्वाचे आहे. आज महराष्ट्रात येणारा कामगार हा बहुतांश बाहेरील राज्यातील असून आपल्या राज्यात कौशल्यसंपन्न कामगार तयार व्हावेत यासाठी अधिकाधिक प्रयत्न व्हावेत.”
सरकारकडे जमा असलेला कामगार कल्याण निधी योग्य ठिकाणी वापरला जावा यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेत अधिकाधिक कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे. हे करीत असताना केंद्र सरकारच्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ जास्तीत जास्त कामगारांना व्हावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. क्रेडाईसोबत काम करीत कामगार विभागही कामागारांच्या हिताच्या दृष्टीने आश्वासक पाऊले उचलत असल्याचे शैलेंद्र पोळ यांनी सांगितले.
ग्राहकाला वेळेत आणि चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देणे हे आम्हा बांधकाम व्यावसायिकांचे कर्तव्य असून हे करीत असताना बांधकाम कामगार हा या क्षेत्राचा आधारस्तंभ आहे हे विसरता कामा नये. प्रकल्पांवर कामगारांना सन्मानपूर्वक वागणूक मिळायला हवी. बांधकाम कामगारांसोबतच बांधकाम व्यावसायिक आणि प्रकल्पावर कार्यरत असलेले अभियंते यांचाही सन्मान व्हावा हा या पुरस्कारामागील हेतू असल्याकडे नाईकनवरे यांनी लक्ष वेधले.
जे पी श्रॉफ यांनी प्रास्ताविक केले तर सपना राठी यांनी या पुरस्काराच्या विविध श्रेणी, विभाग आणि प्रक्रियेची माहिती उपस्थितांना दिली. अभिजित सिच्ची यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर अश्विन त्रिमल यांनी आभार मानले.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन