पुणे, १५ एप्रिल २०२५ ः पुण्यातील सर्वात जास्त लांब अशी ओळख असलेला सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर यादरम्यानचा उड्डाणपूल बांधून तयार झाला आहे. पुलावर डांबरीकरण, रंगरंगोटीची कामेही पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा देणे आवश्यक असताना या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर टाकला जात आहे.
सिंहगड रस्त्यावर हिंगणेपासून ते धायरीपर्यंत सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२२ मध्ये या कामाचे भूमिपूजन झाले. या प्रकल्पाचा एकूण खर्च ११८ कोटी रुपये असून यामध्ये तीन उड्डाणपुलांचा समावेश आहे. धायरीच्या दिशेने जाण्यासाठी विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटर या उड्डाणपुलाची लांबी २१२० मीटर आहे. स्वारगेटच्या दिशेने जाण्यासाठी शिवा काशीद चौक ते हिंगणे या उड्डाणपुलाची लांबी १५४० मीटर इतकी आहे. याचे काम प्रगतिपथावर असून उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने रॅम्प तयार करण्याचे काम सुरु आहे. दुहेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी १६.३ मीटर आहे. एकेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी ८.१५० मीटर आहे. भविष्यात मेट्रो मार्गिकेचा विचार करून आवश्यक ती जागा ठेवण्यात आली आहे. तर राजाराम पूल चौकात ६५० मिटर लांबीचा पूल बांधला असून, हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
२० मिनिटांचा प्रवास तीन ते चार मिनिटात
पुण्याच्या विविध भागात १८ उड्डाणपूल आहेत, त्यात आता विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटर या दरम्यान बांधण्यात आलेला उड्डाणपूल २१२० मिटर लांबीचा आहे. विठ्ठलवाडी पासून ते फनटाइम थिटएरपर्यंत येण्यासाठी गर्दीच्या वेळी कमीत कमी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. हिंगणे चौक, संतोष हॉल, ब्रह्मा हॉटेल, काशीद चौक या ठिकाणी सिग्नलला थांबावे लागते. तसेच गर्दीमुळे वाहनांचा वेग मंदावतो. हा उड्डाणपूल खुला झाल्यानंतर दोन किलोमीटरचा प्रवास तीन ते चार मिनिटात पूर्ण होणार आहे.
विद्यूत विभागाचा वेळकाढूपणा
विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटर दरम्यानच्या उड्डाणपुलाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यावर डांबरीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. विद्युत विभागाने पथ दिव्याचे खांब उभे करून जवळपास एक महिना झाला आहे, पण त्यावर दिवे लावण्यास उशीर केला जात आहे. तसेच उड्डाणपूल सुरु होण्यापूर्वी दिशादर्शक फलक लावण्यासाठीही प्रकल्प विभागाकडून उशीर होत आहे.
राजकीय सोईसाठी विलंब ?
सिंहगड रस्त्यावरील या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी अजूनही महापालिका प्रशासनाला उद्घाटनाचा मुहूर्त सापडलेला नाही. यापूर्वी मार्च अखेरीस उड्डाणपूल खुला केला जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. पण आता अर्धा एप्रिल महिना संपला तरीही किरकोळ कामे शिल्लक ठेवून उड्डाणपूल खुला करण्यास विलंब केला जात आहे. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम महापालिकेतर्फे आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अजून यासाठी वेळ मिळाला नसल्याने या राजकीय सोईसाठी उड्डाणपूल खुला करण्यास विलंब केला जात असल्याची चर्चाही सुरु आहे.

More Stories
Pune: विश्रांतवाडी–आळंदी रस्त्यावरील अपघातांच्या विरोधात ‘डिव्हायडरची आरती’; अर्धवट बीआरटी मार्ग हटवण्यासाठी आंदोलन
पुणे जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’चे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन