July 25, 2024

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोवर मोटार आदळून शाळकरी मुलीचा मृत्यू

लोणावळा, १९/०५/२०२३: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोवर मोटार आदळून शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उर्से टोलनाक्याजवळ पहाटे घडली. अपघातात मोटारीतील पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सारा जावेद कुरेशी (वय १५,रा. कोंढवा) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे. असीम जावेद कुरेशी (वय १०), खैरून रमजान कुरेशी (वय ५८), जावेद कुरेशी, नाजनीन कुरेशी, हरेश कुरेशी (सर्व रा. कोंढवा) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. कुरेशी कुटुंबीय पुण्यातील कोंढवा भागात राहायला आहेत. कुरेशी कुटुंबीय मोटारीतून पहाटे तीनच्या सुमारास द्रुतगती मार्गावरुन पुण्याकडे निघाले होते. त्या वेळी उर्से टोलनाक्याजवळ द्रुतगती मार्गावरील मार्गिकेच्या कडेला थांबलेल्या टेम्पोवर मोटार आदळली.

मोटारीची धडक एवढी जोरात होती की, दर्शनी भागाचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी, देवदूत मदत पथक तसेच महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मोटारीत अडकलेल्या गंभीर जखमींना बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या सारा कुरेशीसह कुटुंबीयांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.