पुणे, दि. २० मार्च, २०२३: अनुप जोशी यांची तबला अँड बियाँड संगीत संस्था आणि प्रज्ञा देव यांची निर्विकल्प संगीत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, येत्या २५ व २६ मार्च रोजी अनुभूती संगीत सभा या तबलावादनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एरंडवणे येथील कर्नाटक हायस्कूलमधील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह या ठिकाणी दोन्ही दिवस सायंकाळी ६ वाजता सदर कार्यक्रम होणार असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.
शनिवार दि. २५ मार्च रोजी कार्यक्रमाची सुरुवात अनुप जोशी यांचे शिष्य अनुराग अलूरकर यांच्या एकल तबला वादनाने होईल त्यानंतर सुप्रसिद्ध तबलावादक ओजस अढिया यांच्या एकल तबला वादनाने पहिल्या दिवसाचा समारोप होईल. ओजस अढिया हे तरुण पिढीतील प्रसिद्ध तबलावादक असून यांनी अनेक जगप्रसिद्ध कलाकारांना तबल्यावर साथ केली आहे.
रविवार २६ मार्च रोजी कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात उस्ताद अल्लारखा यांचे ज्येष्ठ शिष्य अमृत बापट यांच्या एकल तबला वादनाने होईल. त्यानंतर अनुव्रत चॅटर्जी यांचे एकल तबला वादन उपस्थितांना अनुभवता येईल. अनुव्रत चॅटर्जी हे फारुखाबाद घराण्याचे वादक असून, त्यांनी जगप्रसिद्ध तबलावादक, आपले वडील आणि गुरु पं अनिंदो चॅटर्जी यांकडून तबलावादनाचे धडे घेतले आहेत. पद्मभूषण ज्ञान प्रकाश घोष यांचे सर्वांत तरुण आणि शेवटचे गंडाबंध शिष्य असेलेल्या अनुव्रत यांनी जगप्रसिद्ध कलाकारांना तबल्यावर साथसंगत केली आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमात मिलिंद कुलकर्णी, कल्पतरू ठाकरे आणि उपेंद्र सहस्रबुद्धे हे हार्मोनियमवर साथ करतील तर मंगेश वाघमारे हे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन