November 12, 2025

पीएमपी बसच्या ट्रॅकिंग सिस्टीम खरेदीत घोटाळा आम आदमी पक्षाचा आरोप

पुणे, १९ मार्च २०२५ : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएल) बसमध्ये बसविलेली ट्रॅकिंग सिस्टीम व पॅनिक बटण ही यंत्रणा दुप्पट दराने खरेदी करून लाखो रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे, असा आरोप आम आदमी पक्षातर्फे बुधवार पत्रकार परिषदेत करण्यात आला.

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे व उपाध्यक्ष सेंथिल अय्यर यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. अय्यर म्हणाले, “पीएमपीएल बसच्या दैनंदिन सद्यःस्थितीची माहिती नागरीकांना उपलब्ध व्हावी, यासाठी बसमध्ये जीपीएस ट्रॅकींग सिस्टीम बसविण्याची आम्ही मागणी केली होती.त्यानुसार, पीएमपीएल प्रशासनाने ठेकेदारामार्फत १२६५ बसमध्ये ही यंत्रणा बसविली, आणखी २७६ बसमध्ये ही यंत्रणा बसविलेली नाही. या यंत्रणेसाठी किती खर्च आला, त्यासाठी किती बजेट ठेवले होते, याबाबतची माहिती आम्ही प्रशासनाला विचारली, तेव्हा त्यांच्याकडे अशी माहितीच उपलब्ध नसल्याचे उघड झाले. त्यानंतर माहिती अधिकारात माहिती मिळविल्यानंतर केवळ दोन कंपन्यांनाच यंत्रणा बसविण्याचे कंत्राट दिल्याची माहिती पुढे आली. एक जीपीएस ट्रॅकींग सिस्टिीम व पॅनिक बटण बसविण्यासाठी बाजारभावानुसार साडे सहा ते सात हजार रूपये खर्च येतो, असे असताना ठेकेदाराकडुन महागड्या व दुप्पट दराने ही यंत्रणा बसविली. त्यासाठी ३२ लाख खर्च येण्याऐवजी ६४ लाख रूपये खर्च आला आहे. संबंधित ठेकेदारांबरोबरील करारातही अनेक त्रुटी आहेत. पीएमपीएल प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र त्यांनी ईमेलद्वारे माहिती देण्यास सांगितले आहे.’

जगदाळे म्हणाले, “बसमध्ये जीपीएस ट्रॅकींग सिस्टिीम व पॅनिक बटण बसविण्यासाठी १५ ते २० लाख रुपये खर्च येणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदारांच्या फायद्यासाठी दुप्पट ते तिप्पट दराने ही यंत्रणा खरेदी करण्यात आली. या लाखो रूपयांच्या घोटाळ्याची पीएमपीएल प्रशासनाने स्वतंत्र चौकशी करावी. अन्यथा या भ्रष्टाचाराविरुद्ध रस्त्यावर उतरून आवाज उठविला जाईल.’