पुणे, १९ मार्च २०२५ ः संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या शहराच्या पूर्व भागातील काही प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेकडून संरक्षण विभागास आता सुधारीत प्रस्ताव पाठविला जाणार आहे. संरक्षण विभागाकडून संबंधित रस्त्यांच्या रूंदीकरणाच्या कामाला परवानगी मिळाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागासह वेगवेगळ्या भागात नागरीकांना दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे वाहनांची वाढती संख्या आणि दुसरीकडे अरूंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडुन शहराच्या वेगवेगळ्या भागातील प्रमुख रस्त्यांच्या रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र संबंधित प्रमुख रस्त्यांना जोडणारे पर्यायी रस्ते संरक्षण विभागाच्या हद्दीत येतात. संबंधित रस्ते वाहतूकीसाठी खुले आहेत, मात्र विकास आराखड्यानुसार या रस्त्यांचे रूंदीकरण प्रस्तावीत आहे.दरम्यान, महापालिका व वाहतुक पोलिसांकडुन संबंधित रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार, कल्याणीनगर पूल ते पिंगळे वस्ती दरम्यानचा नॉर्थ मेन रस्ता, गोळीबार मैदान ते कोंढवा, लुल्लानगर रस्ता (गंगाधाम चौक परिसर), घोरपडी रस्ता ते भैरोबानाला रस्ता, भैरोबानाला ते नेताजी नगर रस्ता, या रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी जागा मिळण्याबाबतचे पत्र महापालिकेने संरक्षण विभागाला पाठविले होते. मात्र त्यामध्ये पुढे काही घडले नाही.
या पार्श्वभूमीवर, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातुन सर्व विभागांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, संरक्षण विभाग, पोलिस प्रशासन, कॅन्टोन्मेंट बोर्ड अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. सर्व विभागांनी एकत्र नियोजन करत शहरासाठी योग्य निर्णय घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या. तसेच संरक्षण विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेने रस्ता रूंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागांबाबतचा सुधारीत प्रस्ताव दाखल करावा, अशाही सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
More Stories
फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान, दुमजली उड्डाणपूलाचे श्रेय घेण्यासाठी आजीमाजी आमदार सरसावले, राज्य सरकारने दिली मंजूरी
पुण्यातील टेकड्यांना हात लावू देणार नाही, ग्रीन पुणे मुव्हमेंटचा इशारा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी