June 22, 2025

निवडणूक कामकाजास गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, २९ ऑक्टोबर २०२४: निवडणूक कामकाजांतर्गत प्रथम प्रशिक्षणास विनापरवानगी गैरहजर राहून हलगर्जीपणा केल्याबद्दल लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील कलम ३२ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याने संबंधित गैरहजर अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ निवडणूक कर्तव्यावर हजर व्हावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामकाजाकरीता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ नुसार संबंधित विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्यक विविध आस्थापनांच्या मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित मतदार संघातील शाळा, महाविद्यालये, शासकीय, निम-शासकीय कार्यालये, विविध आस्थापना, केंद्र शासन व सहकारी संस्था, बँका व खासगी आस्थापनांकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सर्व २१ विधासभा मतदार संघात निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण त्या त्या मतदार संघात २६ व २७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, त्यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत नोंद घेवून तात्काळ निवडणूक कर्तव्यावर हजर व्हावे, असेही डॉ. दिवसे यांनी स्पष्ट केले आहे.