May 18, 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृत महोत्सव:विशेष बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण

मुंबई, दि. १९: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या विशेष बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरु डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह विद्यापीठाचे सदस्य उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रात पुण्याचाच नव्हे, तर देशाचा मानबिंदू असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पंच्यात्तर वर्षात पदार्पण केले असून विद्यापीठाचे अमृत महोत्सवी वर्ष थाटात साजरे केले जात आहे. १० फेब्रुवारी २०२३ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वर्षभर विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या बोधचिन्हासाठी विद्यापीठातर्फे स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 106 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेल्या अनुराग साळुंखे यांच्या बोधचिन्हाची निवड करण्यात आली. याप्रसंगी विजेत्या अनुरागचे ही मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी अमृत महोत्सव समितीचे सदस्य डॉ. संगीप पालवे, श्री सागर वैद्य, डॉ. धोंडीराम पवार, श्री, अशोक सावंत, श्री विजय सोनवणे, सचिन गोरडे पाटील, डॉ, नितिन घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.